एम्स, मेडिकल, मेयो रुग्णालयातील धक्कादायक चित्र
नागपूर : मेडिकल, मेयो, एम्स या रुग्णालयात सौम्य लक्षण असलेल्या करोनाबाधितांना तपासणीसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. येथे रुग्णांचा भार सातत्याने वाढतच असल्याने तपासणीसाठी सर्व तासन्तास ताटकळत पडतात. यातले काही रुग्ण परिसरात फिरत असल्याने इतरांना संक्रमणाचा धोका वाढला आहे.
अनेक रुग्ण मेडिकल, मेयो आणि एम्स या शासकीय रुग्णालयात विविध तपासण्यांसाठी येतात. एकेक तपासणीसाठी रुग्णांना दीड ते दोन तास प्रतीक्षा करावी लागते. तीन तपासण्या असतील तर तब्बल पाच ते सहा तास लागतात. रुग्णांसाठी स्वतंत्र मोठी जागा, स्वतंत्र स्वछतागृह नाही. लहान मुले येथे नेहमीच रडताना दिसतात. एम्सकडून नागपूरच्या नागरिकांना खूप अपेक्षा आहेत, परंतु एम्समध्ये हे बाधित तासन्तास तपासणीसाठी ताटकळत असल्याने येथे उपचाराला येणाऱ्या इतर आजाराच्या रुग्णांमध्ये संक्रमण वाढण्याचा धोका आहे. कुणाला स्वछतागृहात जायचे असल्यास त्यांना थेट करोनाबधितांच्या वॉर्डाजवळील निर्माणाधीन इमारतीच्या पाचव्या माळ्यावर पाठवले जाते. हे स्वछतागृह बाधितांसाठी असल्याने त्यांचा येथे मोठय़ा प्रमाणात वावर असतो. त्यामुळे चाचणीत नकारात्मक आलेल्या व्यक्तीने हे स्वछतागृह वापरल्यास त्यांनाही संक्रमणाचा धोका वाढत आहे. या गंभीर गोष्टीकडे कुणाचे लक्ष नाही. मेडिकल आणि मेयो प्रशासनाने आवश्यक सोय केल्याचा दावा केला आहे. एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 1:06 am