संशयित रुग्ण तपासणीचे अद्ययावत कक्ष विकसित

नागपूर : डॉक्टरांना करोना संसर्ग टाळण्यासाठी  उपराजधानीतील दोन डॉक्टरांनी करोना तपासणीचे अद्ययावत कक्ष तयार केले आहे.  या प्रक्रियेत डॉक्टर थेट रुग्णाच्या संपर्कात येणार नसल्याने  आजाराचे संक्रमध टळू शकेल. हे कक्ष मेडिकलला भेट देण्यात आले.

खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या संकल्पनेतून  ऑरियस इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्सेस (स्टेट ऑफ आर्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर)चे डॉ. परीक्षित महाजन आणि डॉ. अनंतसिंग राजपूत यांनी ते तयार केले आहे. एखाच्या व्यक्तीमध्ये करोनाचे निदान करण्यासाठी  घशातील द्रव्याचे नमुने  काढून ते तपासणीला पाठवावे लागते. त्याच्या अहवालावरूनच  करोना आहे की नाही, हे स्पष्ट होते. या तपासणीदरम्यान डॉक्टरांसह मदतनीस रुग्णाच्या संपर्कात येतो. त्यामुळे संक्रमणाचा धोका असतो.

हल्ली हे संक्रमण असलेले आरोग्य कर्मचारी राज्याच्या विविध भागात वाढत आहेत. दुसरीकडे आज आवश्यकतेच्या तुलनेत वयक्तिक सुरक्षा संच (पीपीई)चा तुटवडा आहे.  या अडचणींवर मात करण्यासाठी डॉ. विकास महात्मेच्या संकल्पनेतून शहरातील या दोन डॉक्टरांनी हे कक्ष विकसित केले आहे. या काचेच्या केबीनमधून दोन ग्लब्ज बाहेर काढण्यात आले आहेत. त्यातून संबंधित डॉक्टर पलीकडे उभ्या रूग्णाला तपासून नमुनेही काढू शकतो. या प्रक्रियेत डॉक्टर थेट रुग्णाच्या संपर्कात येत नाही.  हे अद्ययावत कक्ष खासदार महात्मे यांच्या  हस्ते  मेडिकल रुग्णालयाला भेट देण्यात आले. याप्रसंगी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे उपस्थित होते.