वकिलांमार्फत शुक्रवारी उत्तर सादर, भोसरीतील औद्योगिक भूखंड प्रकरण

पुण्याच्या भोसरी येथील औद्योगिक विकास महामंडळाचा भूखंड लाटल्याच्या आरोपाखाली पायउतार व्हावे लागलेले तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आरोपांबाबत चौकशी समितीकडे वकिलांमार्फत शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) उत्तर सादर केले आहे. समितीकडून या उत्तरावर अभ्यास करून पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.

तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी येथील भूखंड पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे खरेदी केल्याचा आरोप लावण्यात आला होता. चार महिन्यांपूर्वी हा मुद्दा बराच गाजल्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले.

विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. डी. एस. झोटींग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. समितीने दोन महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष भोसरीला भेट देऊन जागेची पाहणीही केली होती. याप्रसंगी समितीकडून त्यांच्याकडे आलेल्या दस्तावेजांचा अभ्यासही केला होता. आरोपांबाबत २५ ऑक्टोबपर्यंत बाजू लेखी स्वरूपात  मांडावी, अशी सूचना खडसे यांना समितीच्या वतीने अलीकडेच करण्यात आली होती. त्यानुसार खडसे यांच्या वकिलांनी रविभवनातील समिती कार्यालयाकडे शुक्रवारी लेखी उत्तर सादर केले. या उत्तराचा अभ्यास समिती करणार असून त्यानंतर आता पुढील कारवाई निश्चित होणार आहे.

दरम्यान, न्या. झोटींग यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीला २२ नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी अहवाल सादर होणार काय?, याकडे सगळ्याच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.