|| राजेश्वर ठाकरे

सरकारी नियोजनाला निसर्ग आणि शेतकऱ्यांची साथ

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने शेतकरी, शेतमजुरांच्या मृत्यूने विदर्भात हाहाकार उडाला होता. परंतु यंदा त्याचा कमी त्रास झाला. सरकारी पातळीवरील नियोजन, निसर्गाची साथ आणि शेतकऱ्यांमधील जागृती याचा हा एकत्रित परिणाम असल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्य़ात कीटकनाशक फवारणीमुळे  विषबाधा होऊन २२ मृत्यू झाले होते. यंदा अशा प्रकारच्या घटना घडल्या नाहीत. या जिल्ह्य़ात  यंदा सुमारे ४.५ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा आहे. गेल्या वर्षी या जिल्ह्य़ात विषबाधा झाल्याने ५०७ जण रुग्णालयात दाखल झाले होते. या वर्षी ती संख्या ११६ वर आली आहे. या वर्षी अकोला जिल्ह्य़ातील तेल्हारा आणि वर्धा जिल्ह्य़ातील हिंगणघाट तालुक्यात दोघांचे मृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षी राज्यात ६२ जणांचे प्राण गेले होते. त्यात एकटय़ा विदर्भात ४० मृत्यू झाले होते. त्यात यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम आणि वर्धा जिल्ह्य़ांतील शेतकरी, शेतमजुरांचा समावेश होता.

विषबाधेचे प्रकार जनजागृती अभियानामुळे घटले, असे सरकारी अधिकारी सांगत आहेत, परंतु गेल्या वर्षी मोठय़ा प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यंदा तो दिसून येत नाही. त्यामुळे फवारणीची तेवढी गरज पडली नाही हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे.

कीटकनाशकाच्या संपर्कात आल्यामुळे महाराष्ट्रात दर वर्षी सरासरी ३० ते ६० शेतकऱ्यांचे मृत्यू होतात. या वर्षी दोन मृत्यू झाले. हे आपत्ती व्यवस्थापनाचे यश आहे, असे कृषी खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण प्रमुख  सुभाष काटकर म्हणाले. आम्ही गावामध्ये जनजागृती अभियान राबवले  होते. आजाराचे लक्षण दिसताच, शेतकरी समोर आले आणि त्यांना वेळेवर उपचार मिळाल्यावर ते बरे झाले. आम्ही कंपन्यांना या प्रक्रियेत सहभागी करवून घेतले, असेही काटकर म्हणाले.

यवतमाळ जिल्ह्य़ात काही शेतकरी, शेतमजूर कृषी खात्याकडून मिळालेली किट वापरताना दिसले. यात मास्क, हातमोजे आणि अ‍ॅप्रॉन होते, परंतु अनेक शेतमजुरापर्यंत ही किट पोहोचलेली नाही. त्यामुळे काही जण नाकातोंडाला रुमाल बांधून फवारणी करीत होते.

यवतमाळ शासकीय रुग्णालयात गेल्या वर्षी घाटंजी तालुक्यातील दहेगाव गावातील शेतमजूर रघुनाथ कनाके, निखिल कटाने आणि गजानन चिकराम हे १५ दिवस रुग्णालयात होते. त्यापैकी केवळ चिकराम यांनी फवारणी करताना सुरक्षेसाठी तोंडाला रुमाल बांधला होता. इतर दोघांनी फवारणीचे काम सोडल्याचे सांगितले.

सरकारतर्फे जनजागृती अभियान घेण्यात आले, परंतु गेल्या वर्षीप्रमाणे यंदा झाडांची उंची वाढलेली नाही. त्यामुळे डोक्याच्या वपर्यंत फवारणी करण्याची आवश्यकता नाही, असे शारी गावचे भीमराव तोडसाम म्हणाले.

कीटकांची अंडी दिसताच फवारणी करण्याचा सल्ला दिला. त्याचा परिणाम असा झाला की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फवारण्या कमी झाल्या आहे. या वर्षी ८ ते १० फवारण्या झाल्या, त्या गेल्या वर्षी १५ पर्यंत गेल्या होत्या. यवतमाळ जिल्ह्य़ात जुलै आणि ऑगस्टमध्ये किमान २८ हजार सेफ्टी किट्स-मास्क, ग्लव्ह्ज आणि सिंथेटिक अ‍ॅप्रॉन नि: शुल्क वितरित करण्यात आले. त्यामुळेही विषबाधेवर नियंत्रण आले असे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे निसर्गाला त्याचे श्रेय जाते. तसेच गेल्या वर्षीच्या अनुभवामुळे शेतकरीदेखील शहाणा झाला. त्याने पुरेशी काळजी घेतली, असे शेतकरी नेते विजय जावंधिया म्हणाले.

या वर्षी कृषी अधिकाऱ्यांनी दोन प्रमुख गोष्टीवर भर दिला. २६ मेच्या आधी बाजारात बियाणे येऊ दिले नाही. तसेच कीटकनाशकाच्या मिश्रणामुळे विषबाधेचे प्रमाण वाढले होते. ते लक्षात घेऊन त्या कीटकनाशकांवर दोन महिने बंदी घालण्यात आली. मागील वर्षी पेरणीला मेच्या शेवटी सुरुवात झाली होती आणि जूनच्या शेवटपर्यंत ती सुरू होती. त्यामुळे कापसाच्या पिकाला फूल येण्याचा कालावधी अधिक होता आणि बोंडअळीही अधिक काळ होती.  – सुभाष काटकर, प्रमुख गुणवत्ता नियंत्रण, कृषी खाते

शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. कंपन्यांना या कार्यक्रमात सहभागी करून जबाबदार धरण्यात आले. तसेच विषबाधा झाल्यांवर त्वरित उचार करण्यात आले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्य़ात यंदा एकाचाही प्राण गेला नाही. विदर्भात केवळ अकोला जिल्ह्य़ात मृत्यू झाला आहे.    – किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक स्वालंबन मिशन.