महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना

त्रिमूर्तीनगरातील अनेक नागरिकांना, विशेषकरून महिलावर्गाला  दुपारच्यावेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या परिसरात दुपारच्यावेळी फिरणाऱ्या तृतीयपंथीयांचा त्रास वाढला आहे. विशेष म्हणजे, येथून जवळच पोलीस ठाणे आहे, पण त्यांचाही धाक नसल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्रिमूर्तीनगर चौक  परिसर हा तसा गजबजलेला परिसर आहे. या  परिसरात फळ, भाजीविक्रेत्यांची लहान-मोठी  अनेक दुकाने आहेत. तसेच अनेक वसाहती देखील आहे. तृतीयपंथीयांचा त्रास पूर्वी रेल्वेपुरताच मर्यादित असायचा. मात्र, आता शहरातही त्यांनी धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. दुकानांमध्ये जाऊन पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांची मजल घराची बेल वाजवून आत शिरण्यापर्यंत गेली आहे. त्रिमूर्तीनगरातील म्हाडा वसाहतीत अलीकडेच एका घरी कार्यक्रम असताना मोठय़ा संख्येत जाऊन त्यांनी पैशांची मागणी केली. घरातील मंडळींनी पैसे दिले. मात्र, पुन्हा आठ दिवसाने त्याच घरी जाऊन जबरीने पैसे मागण्यात आले. दुपारच्या वेळी महिला घरात एकटय़ा असतात आणि नेमकी हीच वेळ साधून तृतीयपंथीयांच्या टोळ्या या परिसरात फिरतात. दाराची बेल वाजवणे, दार जोरजोराने ठोकणे आणि दार उघडले नाही, पैसे दिले नाही तर घाणेरडय़ा शिव्या देणे, हा प्रकार या परिसरात सातत्याने घडत आहे.

काय म्हणतात नागरिक?

पुरुषांनाच जेथे हे तृतीयपंथीय घाबरत नाहीत, तेथे महिलांना काय घाबरणार? मारामारी, खून करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे. अशावेळी काही चुकीचे घडले तर त्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न शैलजा काकडे यांनी उपस्थित केला.

तृतीयपंथीयांनी या परिसरात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या वेगवेगळ्या टोळ्या फिरतात. दुपारच्यावेळी महिला एकटय़ा असल्याची संधी ते साधतात. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी सोनाली अडावदकर यांनी केली आहे.