देवेश गोंडाणे

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) उच्च शिक्षण संस्था सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र, राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात आग्रही  राज्य सरकारने ‘यूजीसी’च्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत महाविद्यालय सुरू करण्याबाबत मौन बाळगले आहे.

करोनामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्था बंद आहेत. दिवाळीनंतरच्या काळात महाविद्यालये, विद्यापीठे सुरू करण्याच्या दृष्टीने यूजीसीने मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. मात्र, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

विशेष म्हणजे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भातही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मवाळ भूमिका घेतली होती. यूजीसीच्या आदेशानंतरही परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर  राज्यात अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षा झाल्या. उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग ग्रामीण भागामध्ये राहतो. इंटरनेट व अन्य समस्यांमुळे त्याला ऑनलाईन शिक्षण घेणेही अडचणीचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करताना महाविद्यालयांसदर्भातही निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

यूजीसीच्या सूचना

उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश देताना प्रत्येकाच्या शरीराचे तापमान मोजणे, मुखपट्टी, सॅनिटायझेशन यंत्रणा उपलब्धतेची तपासणी करणे, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असलेल्यांना प्रवेश देऊ नये. विद्यापीठे, महाविद्यालयांनी नियमित निर्जंतुकीकरणासाठी कार्यप्रणाली निश्चित करावी, शैक्षणिक आणि नोकरीच्या संधींचा विचार करून अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बोलावता येईल, ऑनलाईन किंवा दूरस्थ शिक्षण प्रणालीला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावे, असे यूजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करून वापरण्याबाबत प्रोत्साहन देण्याची सूचना करण्यात आली आहे.

अभियांत्रिकीचे वर्ग १ डिसेंबरपासून

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याची सूचना केली आहे. यापूर्वी हे वर्ग १ नोव्हेंबरपासून सुरू होणार होते. परंतु प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता डिसेंबरपासून वर्ग सुरू होणार आहेत.

करोनाच्या रुग्णांमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कुलगुरू, पालक, शिक्षक या सगळ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. मात्र, तुर्तास उच्च व तंत्र शिक्षण संस्था सुरू करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही.

-उदय सामंत, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण.