‘इन्स्टिटय़ूट ऑफ इंटेग्रेटेड डेव्हलपमेंट’चा उपक्रम

आपण ज्या भागातून आलो, त्या भागातील लोकांचे काही देणे लागतो. याची जाणीव ठेवून शहरात नोकरी करत असताना गावाकडील लोकांसाठी काही करण्याच्या धडपडीतून ‘इन्स्टिटय़ूट ऑफ इंटेग्रेटेड डेव्हलपमेंट’ उभी राहते आणि तिच्या माध्यमातून गेली ३२ वर्षे विविध उपक्रम राबवून ‘फुल नाही तर फुलाची पाकळी’तरी आपल्या गावाकडच्या लोकांना देण्याचा ध्यास डॉ. अशोक धाबेकर यांनी घेतला आहे.

नागपूर महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना डॉ. धाबेकर यांनी विविध उपक्रम राबण्यास सुरुवात केली होती. ग्रामीण भागातील मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळावे, आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचे जीवनमान उंचावे, यासाठी त्यांनी १९८६ ला स्थापन केली. प्राथमिक आरोग्याविषयी जनगाजृती निर्माण करणे आणि ती सुविधा गरजवंतांपर्यंत पोहोचवणे ते करत राहिले. त्यासाठी या संस्थेने अनेक उपक्रम हाती घेतले आणि आजही घेत आहेत. त्यापैकी एक प्रकल्प आहे, साधना संस्कृती मिशन. यामध्ये चारित्र्य, मानवविकास आणि राष्ट्र विकासाकरिता कामे केली जातात. अलीकडे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता उमरेडमध्ये कचऱ्यापासून कला हा कार्यक्रम घेण्यात आला. याशिवाय बाल संस्कार शिबीर आयोजित करण्यात येतात. पाच दिवसांच्या शिबिरात गरीब मुलांना वेगवेगळ्या प्रात्यक्षिकातून अप्रत्यक्ष संस्कार करण्याचा प्रयत्न केला जातो.

रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जंगलात आढळणाऱ्या भाज्या कशा ओळखाव्यात, या भाज्यांमध्ये कुठल्या प्रकारचे पोषक घटक असतात, त्या भाज्या कशा शिजवायच्या आणि त्यांचा वापर आपल्या अन्नघटकात कसा केला जाऊ शकतो, याची माहिती दिली गेली. गेल्यावर्षी झालेल्या रानभाजी महोत्सवाला अडीच हजार लोकांनी भेट दिली होती.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. उमरेड नगरपरिषदेतील ७५ सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्ताच्या नमुन्यांच्या सर्व तपासण्या नि:शुल्क करण्यात आल्या. या संस्थेने मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीर शासकीय यंत्रणेच्या सहकार्याने आयोजित केले.

उमरेड येथे मीरा घनश्याम वाचनालय सुरू केले. यासाठी डॉ. धाबेकर यांनी आपले वडिलोपार्जित घर उपलब्ध करून दिले. या वाचनालयाचा उद्देश लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी हा आहे. या वाचनालयात  अभ्यासक्रमाव्यतिरिक्त माहिती, ज्ञान मिळवून देणे हा यामागचा हेतू आहे. कौमुदी पुस्तक पेढी हा उपक्रम देखील या संस्थेच्या माध्यमातून चालवला जातो. हा उपक्रम गरीब, झोपडपट्टीतील मुला-मुलींसाठी आहे. गरिबांची वस्ती, झोपडपट्टीच्या परिसरात सुमारे ५० पुस्तकांचा संच एका पेटीत घेऊन जायचे. त्या वस्तीतील मोकळ्या जागेत सतरंजी टाकून वस्तीतील मुलांना बोलवायचे आणि तेथील मुला-मुलींना पुस्तके वाचायला द्यायचे.

साधारणत: एक ते दोन तास पुस्तके द्यायचे आणि नंतर परत घ्यायचे. दर आठवडय़ातून एक किंवा दोनदा वेगवेगळ्या वस्त्यांमधून हा उपक्रम राबवला जातो. समर्पण अभ्यासिका देखील सुरू करण्यात आली आहे. येथे मुला-मुलींना पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते.

या संस्थेने आणखी तीन उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. यामध्ये परसबाग, कचरा उचलणाऱ्यांचे पुनर्वसन आणि फंक्शनल अ‍ॅन्ड स्पोकन इंग्लिश कोर्स सुरू करण्यात येत आहे. परसबाग या उपक्रमात उमरेड तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात परसबाग लावण्यात येणार आहे. यासाठी कृषी महाविद्यालय, आरोग्य विभाग, एनएसएसच्या युवकांचा सहभाग राहणार आहे. वर्षभर भाजीपाला कसा मिळू शकेल, याचा प्रयत्न परसबागेतून होणार आहे. यामुळे कुपोषण होत असते. परसबाग प्रकल्पासंदर्भात १६ एप्रिलला उमरेडजवळील मकरधोकडा येथे कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. नागपूर शहरातील कचरा उचलणाऱ्यांचे पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाअंतर्गत त्यांना वैद्यकीय सुविधा, शिक्षण आणि कचऱ्यापासून वस्तू तयार करून आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. त्यांच्या सिकलसेल आणि एचआयव्हीसारख्या तपासणी नि:शुल्क करून दिल्या जातील. फंक्शनल अ‍ॅन्ड स्पोकन इंग्लिशचा तीन महिन्यांचा अभ्यासक्रम उमरेडमध्ये सुरू करण्यात येत आहे.