मतदारांशी संपर्कासाठी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ ग्रूप

प्रभाग रचनेनंतर महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच प्रभागातील इच्छुक सक्रिय झाले आहेत. प्रभागातील मतदारांशी संपर्कात राहण्यासाठी  इच्छुकांनी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ ग्रूप तयार केले आहेत.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती निवडणूक प्रचारात किती प्रभावी ठरू शकते याचा प्रत्यय दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी आला होता. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीतही त्याचा व्यापक प्रमाणात वापर होईल हे अपेक्षित होते. त्याची चाहूल निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच लागली आहे. नव्या प्रभाग रचनेत नव्या वस्त्या जोडल्या गेल्या आहेत. तेथील नागरिकांशी आतापासूनच संपर्कात राहण्यासाठी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ हे प्रभावी माध्यम आहे. ही बाब लक्षात घेऊनच इच्छुकांनी या तंत्रज्ञानाचा मार्ग अवलंबणे सुरू केले आहे.

विद्यमान नगरसेवकांनी त्यांच्या पाच वषार्ंतील विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी तर इच्छुकांनी ते काय करणार हे सांगण्यासाठी समाज माध्यमाचा वापर सुरू केला आहे. प्रभाग क्रमांकानुसार ग्रूप तयार केले जात आहेत.

घरोघरी जाऊन अंॅड्राईड फोन कोणाकडे आहे याची विचारपूस  केली जात आहे. मोबाईल क्रमांक मिळवून त्यांचा प्रभागाच्या ग्रूपमध्ये समावेश केला जात आहे. यात काही भाजप आणि काँग्रेसच्या विद्यमान आणि इच्छुक आघाडीवर आहेत.  भाजपचा आयटी विभाग त्या दृष्टीने सक्रिय झाला असून त्यांनी विद्यमान नगरसेवकांना तसे पत्र देऊन प्रभागातील नागरिकांचे मोबाईल क्रमांक जमा करण्याचे निर्देश दिले.

काही विद्यमान नगरसेवकांनी यापूर्वीच ग्रूप तयार केले आहेत. आता त्यांच्या प्रभागात समाविष्ट झालेल्या नवीन वस्त्यांमधील मतदारांचा समावेश केला जात आहे. काँग्रेस आणि बसपाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात प्रत्यक्ष प्रत्यक्ष जनसंपर्कासोबत समाज माध्यमावर विद्यमान आणि इच्छुकांचा भर राहणार असल्याचे दिसून येत आहे.

विकास कामांवर प्रभाग रचनेमुळे पाणी

निवडणुकीत पुन्हा यश मिळावे म्हणून प्रभागाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अनेक विद्यमान नगरसेवकांच्या प्रयत्नांवर नव्या प्रभाग रचनेने पाणी फेरले आहे. यात प्रभागातील विकसित भागांचा समावेश इतर प्रभागांमध्ये झाल्याने त्यांची निराशा झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आणि वस्त्यांमधील आरक्षण निश्चित झाल्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांची फारच पंचाईत झाली आहे. भाजपसह विविध राजकीय पक्षातील विद्यमान नगरसेवकांना याची झळ पोहोचली आहे. दर पाच वर्षांंनी आरक्षण बदलते, वार्ड पुनर्रचनाही होते, मात्र काही वॉर्ड याला अपवाद ठरतात. ही बाब डोळ्यापुढे ठेवूनच नगरसेवक पाच वषार्ंत त्यांच्या विकास कामांचे नियोजन करीत असतात. यंदाही काही नगरसेवकांचे वॉर्ड सहीसलामत राहिले. मात्र अनेकांना फटका बसला.