28 September 2020

News Flash

बुथपातळीवरील असमन्वयाची भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा

पक्षाकडून इन्कार, तक्रार नसल्याचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

पक्षाकडून इन्कार, तक्रार नसल्याचा दावा

भक्कम संघटनात्मक बांधणी हा सर्वात मोठा निवडणूक आधार असलेल्या भाजपात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत याच पातळीवर सर्व काही आलबेल नव्हते, असे मतदानानंतर कार्यकर्त्यांच्या वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेतून स्पष्ट होते. मात्र, याबाबत पक्षाकडे कोणतीही तक्रार आली नाही, असा दावा शहर भाजपने केला आहे.

नागपूर लोकसभा निवडणूक एकहाती जिंकू असा विश्वास शहर भाजपला होता. त्याचा आधारही कार्यकर्त्यांची फौज आणि बुथपातळीपर्यंत पक्षबांधणी हाच होता. पण, शेवटच्या टप्प्यात निवडणूक चुरशीच्या वळणावर गेली. नागपुरात लोकसभेसाठी ५४.२४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक पूर्व नागपूरमध्ये (५७.२१ टक्के) तर सर्वात कमी मतदान दक्षिण नागपूरमध्ये (५३.१२ टक्के) झाले. भाजपचा गढ अशी ओळख असलेल्या दक्षिण-पश्चिममध्ये (५३.८२ टक्के) सुद्धा दक्षिण नागपूरपेक्षा किंचित अधिक मतदान झाले. येथे भरभरून मतदान होईल, अशी अपेक्षा भाजपला होती. येथे घसरलेल्या टक्केवारीसाठी नियोजनातील शिथिलता हे कारण पक्ष कार्यकर्ते देऊ लागले आहेत. मतदानाच्या दिवशी बुथपातळीवरील यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत नव्हती, त्यांना पुरेशी ‘साधन सामुग्री’ मिळाली नाही. पक्षाने बुथसाठी दिलेल्या निधीत काही ठिकाणी नगरसेवकांनी कपात केली. याचा एकूणच परिणाम बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर झाला. मतदारांना आणण्यासाठी अनेक ठिकाणी वाहने कमी होती, असे दक्षिण-पश्चिममधील एका कार्यकत्यांचे म्हणणे होते. दक्षिणमधील कार्यकर्त्यांनीही हीच बाब सांगितली. मध्य नागपुरात काही ठिकाणी भाजपच्या तुलनेत काँग्रेसची बुथ यंत्रणा जास्त क्रियाशील होती, अशी माहिती  सूत्रांनी दिली.

मतदानाच्या दिवशी प्रत्येक आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे त्यांच्या मतदारसंघातील बुथ निरीक्षणाचीही जबाबदारी होती. नेत्यांनी केवळ धावत्या भेटी देऊन ती पार पाडली. काही ठिकाणी तर नेते कारच्या खाली सुद्धा उतरले नाहीत. त्यामुळे खरी स्थिती त्यांना कळलीच नाही.  प्रचार सभा, बैठका घेण्याबाबत पक्षाने ठरवलेले निकषही काही कार्यकर्त्यांसाठी जाचक ठरले. बैठकीला किती लोक येणार, जागेची पाहणी, त्यानंतर परवानगी अशा सरकारी छाप प्रक्रियेमुळेही अनेकांनी बैठका घेणे टाळले. शिस्तीच्या नावाखाली दमदाटी (सभेला उपस्थिती कमी असल्यास संबंधित नगरसेवकांना पुढील वेळी तुमच्या बाबत विचार करावा लागेल, असे काही ठिकाणी सुनावण्यात आले.) याचीही कार्यकर्त्यांच्या गोटात चर्चा आहे.

पूर्व नागपुरातील मतदानाच्या अधिक टक्केवारीबाबत पक्ष पातळीवर समाधान व्यक्त केले जात असले तरी याच मतदारसंघात स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे बेघर होणाऱ्यांची वस्ती आहे, याकडेही कार्यकर्त्यांनी निकालाचे अनुकूल अंदाज बांधणाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ‘पेज प्रमुख’ नियुक्त करूनही मतदारांच्या घरी मतचिठ्ठय़ा का पोहचल्या नाहीत, असा सवालही एका कार्यकर्त्यांने केला.

‘‘मतदानाच्या दिवशी पक्षातर्फे बुथपातळीवर योग्य नियोजन केले होते. कार्यकर्त्यांची सर्व व्यवस्था केली होती. नेते आणि पदाधिकारी त्यांच्या संपर्कात होते. कुठेही असमन्वय नव्हता किंवा याबाबत एकाही कार्यकर्त्यांची तक्रार नव्हती.’’   – आ. सुधाकर कोहळे, अध्यक्ष, शहर भाजप.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 12:51 am

Web Title: internal dispute in bjp 18
Next Stories
1 अघोषित मांसाहारबंदी रुग्णांसाठी धोकादायक
2 महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा कचऱ्यापासून जैविक खत प्रकल्प
3 पंतप्रधान आवास योजनेचे रस्त्यावर अतिक्रमण
Just Now!
X