दोन बडय़ा नेत्यांची परस्परांवर टीका

नागपूरजवळील उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ नावाचा वाघ बेपत्ता होण्याचे पडसाद आता राजकीय पटलावरही उमटू लागले आहे. या मुद्दय़ावरून विदर्भातील पक्षाच्या दोन बडय़ा नेत्यांनी परस्परांवर निशाणा साधणे सुरू केल्याने भाजपमध्ये कलगीतुरा सुरु आहे.

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध ‘जय’ वाघ अचानक बेपत्ता झाल्याने वनखात्याची झोप उडाली आहे. त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. वनखातेही याबाबत काहीच सांगायला तयार नाही. भाजपचे विदर्भातील दोन बडे नेते अनुक्रमे खासदार नाना पटोले आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात या मुद्दय़ावरून सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.

‘जय’ अस्तित्वात नसल्याचे पुरावे अद्याप मिळाले नसल्याने तो जिवंतच असावा यावर वनखाते ठाम असतानाच भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मात्र तो मारला गेला असावा, अशी शंका व्यक्त करून ‘जय’चा शोध घेणारे वनखाते व या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे पटोले यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुनगंटीवार यांनी दिल्ली गाठून थेट केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना ‘जय’चा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवावा तसेच यासाठी लागणारे पुरावे ‘जय’ मारला गेला असे म्हणणाऱ्या पटोले यांच्याक डून प्राप्त करावे, अशी विनंती केली. मुनंगटीवार यांचे हे पाऊल पटोलेंना प्रत्युत्तर मानले जाते.

सध्या पटोले पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे नाराज आहेत. पक्ष आणि नेत्यांपुढे अडचणी निर्माण करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. यापूर्वी त्यांनी संसदेत स्वतंत्र विदर्भासाठी अशासकीय ठराव देऊन पक्षाची कोंडी केली होती. आता ‘जय’च्या मुद्यावर वनखात्याची व पर्यायाने मुनगंटीवार यांची कोंडी केली आहे. एकीकडे ‘जय’ सापडत नसल्याने वन्यजीव प्रेमींचा जीव टांगणीला लागलेला असतानाच  याला राजकीय रंग चढू लागल्याने मूळ मुद्दा भरकटण्याची शक्यता आहे. .