कनक रिसोर्सेसला मुदतवाढीचा विषय

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या  उपस्थितीत हनुमाननगर झोनमध्ये झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात कनक रिसोर्सेस या कंपनीला मुदतवाढ देण्याच्या विषयावरून महापौर नंदा जिचकार आणि महापालिकेचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यावर वाद निवळला.

शहरातील कचरा संकलित करण्याचे कंत्राट महापालिकेने कनक रिसोर्सेसला दिले आहे. जनसंवाद कार्यक्रमात या कंपनीच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारी आल्या. त्यावर बावनकुळे यांनी ही कंपनी बदलण्याबाबत प्रशासनाने काय कारवाई केली? असे अधिकाऱ्यांना विचारले.  नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण व्हायला आणखी काही काळ लागणार असल्यामुळे कनक रिसोर्सेसला काही महिने काम करण्याची विनंती करावी लागेल, असे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. त्यावर महापौर नंदा जिचकार यांनी त्वरित आक्षेप नोंदवला. कनक रिसोर्सेसचे काम काढून इतर कंपनीला देण्याबाबत वारंवार सूचना दिल्यावरही अद्याप निविदा का  निघाली नाही? हा प्रश्न त्यांनी ठाकरे यांना केला.

निविदा प्रक्रियेबाबत सर्व मंजुरी मिळाली. या कामासाठी मोठा कंत्राटदार हवा आहे. निविदा निघाल्यावर मार्चपर्यंत नवीन कंत्राटदार मिळणे शक्य नाही, त्यामुळे कनकला मुदतवाढ द्यावी लागणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मार्चमध्ये कंपनीची मुदत संपणार हे माहित असताना तातडीने प्रक्रिया का पूर्ण केली नाही? असा सवाल महापौरांनी केला. त्यावर पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करत तातडीने निविदा प्रक्रिया करण्याची सूचना महापालिकेला केली.

स्वच्छता मानांकनात घसरण झाल्यास कारवाई

स्वच्छता सर्वेक्षणानंतर जाहीर होणाऱ्या मानांकनात नागपूरची घसरण झाली तर  संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा  बावनकुळे यांनी दिला. सर्वेक्षण झाल्यानंतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. यावेळी ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

तक्रारीनंतरही न्याय मिळत नाही

जनसंवाद कार्यक्रमात दिलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, अशी व्यथा गौतम आडे यांनी मांडली. १५ दिवसांपूर्वी मंगळवारी झोनमध्ये घेतलेल्या जनसंवाद कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या पाच तक्रारींवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.