शहरातील भाजपचे काही आमदार, प्रमुख नेते व कार्यकर्त्यांवर होत असलेले गंभीर स्वरूपाचे आरोप आणि दाखल झालेल्या गुन्ह्य़ांमुळे संघभूमी नागपुरातच भाजपची प्रतिमा काळवंडली आहे.

नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. स्वयंसेवकांना सुरुवातीपासूनच शिस्त, चारित्र्य संपन्नतेचे धडे दिले जाते. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर नागपूरकर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तर नितीन गडकरी हे केंद्रात मंत्री झाल्याने नागपूरचे महत्त्व देशात वाढले. स्वाभाविकच संघभूमीतील लोकप्रतिनिधीकडे साऱ्या देशाचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. मात्र, सत्ता आल्यानंतर त्याचे वाईट गुण आपोआपच सत्ताधाऱ्यांच्या अंगी येतात. तसेच नागपुरातील काही भाजप आमदारांच्या बाबतीतही घडले. गेल्या वर्षांत स्थानिक आमदारावर होत असलेल्या आरोपामुळे भाजप आणि संघावर टीका होऊ लागली. आरोप होणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय व राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांचे नाव अग्रक्रमावर आहेत. एका गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणात ते अद्याप फरार आहेत. विशेष म्हणजे, ते साईमंदिर देवस्थान अध्यक्ष आहेत आणि या देवस्थानावर संघाशी संबंधित पदाधिकारी आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष आणि दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर बनावट कागदपत्र तयार करून भूखंड लाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी गेल्यावर्षी एका बारमध्ये गोंधळ घातला होता. त्यामुळे खोपडे यांच्यावर आरोप झाले. मुंबईतील हॉटेलला लागलेल्या आगीच्या प्रकरणात पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांच्यावर मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आरोप केले होते. विधानसभा आणि विधान परिषद मिळून नागपुरात भाजपचे एकूण नऊ सदस्य आहेत.

भाजप आमदारांवरील आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असून त्यावर न्यायालय निर्णय घेईल. आमदारांवरील आरोप आणि संघभूमी यांचा काहीही संबंध नाही. त्याला संघाशी जोडणे योग्य नाही. विरोधक जर आरोप करीत असतील तर त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांवरील झालेले आरोप तपासावे.    – आमदार गिरीश व्यास, प्रदेश प्रवक्ते, भाजप