25 September 2020

News Flash

आज जागतिक संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिवस

वर्ष २०१६ मध्ये १२९ शांती रक्षकांनी जगभरात शांतता रक्षणार्थ बलिदान दिले.

आजपर्यंत १६० च्यावर भारतीय सैनिकांचे बलिदान
आदिम काळात मानव रानटी, हिंस्र होता आणि त्याला अन्नासाठी शिकार करून जगावे लागत होते तरी उपजतच तो शांतताप्रिय आहे. माणसाच्या जगण्याची वाटचाल शांत जीवन व्यतित करण्याकडेच असते. मात्र, इतिहासातच नव्हे तर वर्तमानातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा काही घटना घडतात की ज्यामुळे माणुसकीलाच काळीमा फासला जातो. अशा वेळी शांततेलाच धोका पोहोचतो. यापूर्वी घडलेली दोन महायुद्धे ही शांतता धोक्यात आल्याचेच द्योतक होते. म्हणून २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची (युनो) स्थापना करण्यात आली.
‘युनो’चा उद्देशच जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे हा आहे. ही जबाबदारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मार्फत पार पाडली जाते. पाच स्थायी सदस्याच्या स्वत:च्या सैन्यामार्फत ती पार पडणे अपेक्षित असते. जागतिक शांतता धोक्यात आणणारी कोणतीही घटना ज्यात युद्ध, आक्रमण, गृहयुद्ध, अराजकतेमध्ये हस्तक्षेप करणे यांचा समावेश असतो. शांतिसेना किंवा शांती सैनिक मोहिमांबाबत ‘युनो’च्या घटनेत स्पष्ट उल्लेख नाही. युनोजवळ स्वत:चे सैन्य असावे की असू नये? यावर मतमतांतरे आहेत. परंतु जगातील काही देशांमध्ये असलेली अराजकता लक्षात घेता शांतता रक्षक दलाची गरज असल्याचे कोणीही शहाणा माणूस सांगू शकेल. आज शांतता मोहिमांच्या मागणीत व कामात मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने केवळ सैनिकचे नव्हे तर बरोबरच पोलीस, महिला रक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.
१९४८ ते आजपर्यंत ६९ मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. यापैकी १६ मोहिमा आजही सुरू आहेत. यासर्व शांतता मोहिमांमधील सहभागी शांतता रक्षकांची संख्या १,१८,००० इतकी आहे. १९४८ पासून ते आजपर्यंत ३,२२३ शांतता रक्षकांनी प्राणांचे बलिदान दिले आहे. ज्यामध्ये सैनिक, सैन्य अधिकारी, पोलीस, नागरी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वर्ष २०१६ मध्ये १२९ शांती रक्षकांनी जगभरात शांतता रक्षणार्थ बलिदान दिले. आज या शांती सेनेमध्ये १२२ देशांच्या सैन्याचा समावेश आहे.
या विषयावर तुमसरच्या एस.एन. मोर महाविद्यालयातील प्राध्यापक सचिन वेरुळकर पीएच.डी. करीत असून ते म्हणाले, भारताने नेहमीच जागतिक शांततेचा पुरस्कार केला आहे. शांतता प्रस्थापित करून कायदा व सुव्यवस्थेच्या स्थापनेसाठी मोठय़ा प्रमाणावर पोलिसांची आवश्यकता भासते. आज ११,००० पेक्षा जास्त पोलीस जगभरात तैनात आहेत. महिलांवरील हिंसाचार, लैंगिक अत्याचार, बालकांवरील अत्याचार, तस्करी इत्यादीमुळे महिला शांतता रक्षकांचीही मागणी वाढत आहे. म्हणून युनोचा महिला शांतता सैनकांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे.
२००७ मध्ये भारताद्वारे एक संपूर्ण महिला तुकडी लायबेरियामध्ये तैनात केली होती. पोलिसांमध्ये महिलांचे प्रमाण १० टक्के तर सैनिकांमध्ये ३ टक्के एवढे आहे. शांतता सेनेमध्ये सर्वाधिक सैनिक पुरवठा करणाऱ्यांमध्ये प्रथम बांगलादेश, पाकिस्तान आणि भारताचा क्रमांक लागतो. हा क्रम बदलत राहतो.

आजपर्यंत भारताद्वारे १,७०,००० शांतता रक्षक ४३ मोहिमांवर पाठवून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. ज्यामध्ये कांगो, सोमालिया, लेबनॉन, सुदान या देशांचा समावेश आहे. भीषण परिस्थिती असलेल्या सुदानमध्येही भारतीय शांतता रक्षक काम करीत आहेत. १९४८ पासून ते आजपर्यंत १५७ भारतीय शांतता सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले. सध्या दहा मोहिमांमध्ये भारताचे ८,१३२ सैनिक व अधिकारी कार्यरत असून कांगोमध्ये ४,०३४ तर लेबनॉन मध्ये ८९४ आहेत. आजपर्यंत सर्वात जास्त ३९ भारतीय कांगोच्या मोहिमेत बळी पडले. गेल्यावर्षी ४ भारतीय सैनिकांनी बलिदान दिले. असे आजपर्यंत १६०च्यावर भारतीय शांतता सैनिकांचे बलिदान झाले आहे. वर्ष २००० पासून शांतता रक्षकांच्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी युनोचे दुसरे सरचिटणीस डाम ह्य़ामरशोल्ड यांच्या नावाने पदक दिले जाते. यावर्षी चार भारतीय शांती रक्षकांना हे पदक घोषित करण्यात आल्याचे वेरुळकर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 12:02 am

Web Title: international day of united nations peacekeepers
Next Stories
1 महसूल कर्मचारी संघटनेच्या निवडणुकीत प्रस्थापित पराभूत
2 अभिष्टचिंतनासाठी फडणवीस गडकरी वाडय़ावर
3 तेलंगणाच्या सिंचन प्रकल्पांची केंद्र सरकारकडे तक्रार करणार!
Just Now!
X