तीस चित्रपट सादर होणार -डॉ. जब्बार पटेल

जगात विविध भाषेत दर्जेदार चित्रपट निर्मिती केली जात असताना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपट प्रदर्शित केले जातात. असे आशयघन चित्रपट बघण्याची पर्वणी वैदर्भीय रसिकांना लाभणार आहे. ऑरेंजसिटी कल्चरल फाऊंडेशनच्या वतीने पुढील वर्षी २७ ते २९ जानेवारीदरम्यान प्रथमच ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचा हा चित्रपट महोत्सव नागपुरात होणार आहे.

याबाबत डॉ.जब्बार पटेल म्हणाले की, राज्य शासन, पुणे फिल्म फाऊंडेशन, सप्तक आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या सहयोगाने हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. शासनाचा हा अधिकृत चित्रपट महोत्सव असून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचाच हा एक भाग असेल. यंदा हा महोत्सव तीन दिवसांचा करणार असलो तरी त्यानंतर पाच दिवसांचा करण्याचा प्रयत्न असेल. या महोत्सवाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर उपाध्यक्ष म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार असणार आहे. पुणे महोत्सवात स्पर्धेसाठी येणाऱ्या चित्रपटांमधून सर्वोत्तम चित्रपट या ऑरेंजसिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केले जातील. त्यात भारतीय प्रादेशिक भाषांसह आंतरराष्ट्रीय भाषिक चित्रपटांचा समावेश राहणार आहे. विशेष म्हणजे, हे सर्व चित्रपट आंतरराष्ट्रीय परीक्षकांच्या मागदर्शनाखाली निवडण्यात येतील. असे एकूण ३० चित्रपट या महोत्सवात सादर होणार असल्याचे डॉ. जब्बार पटेल व महोत्सवाचे संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

या निमित्ताने आयोजनाची तयारी म्हणून येत्या काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने पाच मिनिटांच्या लघुपट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. शिवाय, ७ ऑगस्टला नवीन पिढीने या क्षेत्राकडे वळावे आणि नवनवीन प्रयोग करावे यासाठी चित्रपट प्रोत्साहन कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यात राज्यातील विविध भागातील विद्यार्थी सहभागी होतील. त्यात डॉ. जब्बार पटेल आणि समर नखाते व चित्रपटक्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या स्पर्धेतील चित्रपटांचे परीक्षकां परीक्षण करून प्रथम तीन लघुपटांना १ लाख, ७५ हजार व ५० हजार रुपये रोख, अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. यावेळी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात या महोत्सव समितीचे कार्यालय राहणार आहे. यावेळी विलास मानेकर, वामन तेलंग, डॉ.उदय गुप्ते, अजय गंपावार, डॉ. श्रीराम काणे उपस्थित होते.

नागपूरची ओळख आंतरराष्ट्रीय नकाशावर व्हावी

प्रत्येक चित्रपट महोत्सव हा त्या त्या शहराच्या नावे आयोजित केले जातात. गेल्या १४ वषार्ंपासून पुण्यात होमाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला जगभरातून प्रतिसाद मिळतो. ही पुण्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या भागातील र्पयटन वाढवणे आणि शहराची ओळख आंतरराष्ट्रीय नकाशावर व्हावी या उद्देशाने हा चित्रपट महोत्सव नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. नागपूर महोत्सव, असे नाव न ठेवता आणि त्यावर सरकारने शहराचे नाव घेण्यास मनाई केल्याने ऑरेंजसिटी आंतरराष्ट्रीय महोत्सव या नावाने तो आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पर्यावरण, व्याघ्रसंवर्धन, जंगलसंवर्धन अशी कल्पना या महोत्सवाची असणार असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.