मुख्यमंत्र्यांचे आश्वासन;  ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

घरच्या प्रतिकूल परिस्थतीवर मात करून भारतीय हॅण्डबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूरच्या पूनम कडावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे तिला दिलासा मिळाला आहे.

पूनमच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधणारी बातमी ‘लोकसत्ता’ने २६ सप्टेंबरला प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत सरकारी यंत्रणेने तिच्याविषयीची सर्व माहिती घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केली. मुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पूनमला भेटीसाठी बोलवले होते. यावेळी त्यांनी तिला खेळाडूंसाठी असलेल्या राखीव कोटय़ातून तिला शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन दिले.

पूनमचे वडील गणेश कडाव महापालिकेत सफाई कामगार आहेत. तर आई रमाबाई धुण्याभांडीचे काम करते. अजनी परिसरातील चुनाभट्टीमध्ये दहा बाय पंधराच्या खोलीत हे कुटुंब राहते. घरी खेळाची पाश्र्वमूमी नसतानाही पूनमने या क्षेत्रात घवघवीत यश मिळवले. आर्थिक परिस्थितीचे चटके तर तिने नेहमीच सहन केलेत. मात्र आई-वडिलांनी उसने पैसे घेऊन तिच्या खेळाला प्रोत्साहन तर दिलेच शिवाय तिच्या गरजाही पूर्ण केल्या. आर्थिक मदतीसाठी गणेश कडाव यांनी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले होते. पूनमने नुकतेच ताश्कंद (उझबेकिस्तान) येथील आशियाई महिला क्लब हॅण्डबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यापूर्वीही तिने ज्युनियर आयएचएफ चषक स्पर्धेत महाराष्ट्राचे आणि वरिष्ठ गटात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

पूनमला नोकरीची नितांत गरज असल्याने आम्ही क्रीडा मंत्रालयाकडे तिच्या कामगिरीचा उल्लेख करून पत्र पाठवले होते. मात्र त्यांनी नियमांची अडचण सांगितली होती. आता पुन्हा ‘स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने पूनमची भारतीय संघात निवड केल्याचे पत्र जोडून प्रस्ताव क्रीडा मंत्रालयाला पाठवला आहे.

– डॉ.सुनील भोतमांगे, पूनमचे प्रशिक्षक