देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होताच विसर पडला
माणूस सत्तेत येण्यापूर्वी किती आश्वासने देतो अन् एकदा का तो सत्तेत आला की, कसा त्या आश्वसनांचा विसर पडतो, हे पुन्हा सिद्ध झाले. देवेंद्र फडणवीस आमदार असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय धावपटू रोहिणी-मोनिकावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्या झोपडीकडे ‘धाव’ घेतली. अद्याप, मुख्यमंत्री कोटय़ातून घोषित झालेली सदनिका कशी काय मिळाली नाही?, असा सवालही केला होता. मला या संदर्भातील सर्व कागदपत्रे द्या, मी विधानसभेत हा मुद्दा मार्गी लावेन, असे आश्वासन राऊत भगिनींना दिले. मात्र, आज फडणवीस मुख्यमंत्री आहेत अन् त्यांना दिलेल्या आश्वसनांचा विसर पडला आहे. आजही राऊत भगिनींना आपल्या हक्काच्या सदनिकेसाठी ‘धाव-पळ’ करावी लागत आहे.
जॉर्डन येथे २००७ मध्ये झालेल्या क्रॉसकंट्री स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व करून राऊत भगिनींनी सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली होती. नागपूरच्या मुलींनी विदेशात भारताचा झेंडा फडकावल्यानंतर त्यांचे भारतात आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले. या चमकदार कामगिरीची दखल घेऊन नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेच्या सभागृहात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या इतिहास घडविलेल्या दोघींनाही रोख रक्कम आणि मुख्यमंत्री कोटय़ातून एकेक सदनिका देण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केली होती.
त्या घोषणेला ९ वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप त्यांना हक्काचे घर मिळालेले नाही. दरम्यान, ही गोष्ट आमदार देवेंद्र फडणवीसांना कळली. त्यांनी राऊत भगिनींच्या राहत्या भाडय़ाच्या झोपडीत जाऊन या सदनिकांबद्दल विचारणा केली अन् मला या संदर्भातील सर्व कागदपत्रे द्या. मी हा विषय विधानसभेत मांडतो, अशी आशा दाखविली.
मात्र, २००७ पासून पाच मुख्यमंत्री बदलले, ९ वर्षांचा काळ लोटला तरीही राऊत भगिनींना घर मिळू नये, यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय असेल.
आपल्या हक्काच्या घरासाठी दोघीही ९ वर्षांपासून शासनदरबारी चकरा मारत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून खासदार, मंत्री, आमदारांपर्यंत सर्वच राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवले. वेळोवेळी स्मरणपत्रेसुद्धा दिली, पण एकानेही त्यांच्या भावनांची कदर केली नाही. सध्या तेच आमदार फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे राऊत भगिनींना न्याय देणार काय?, हा लाखमोलाचा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणासंबंधी पूर्ण माहितीही आहे. त्यांना विदर्भातील खेळाडूंबद्दल खरोखर जिव्हाळा वाटत असेल, तर त्यांच्या एका इशाऱ्यावर राऊत भगिनींना सदनिका सहज मिळू शकतात. मात्र, मुख्यमंत्र्यांना आमदार असताना दिलेल्या आश्वसनाचा विसर पडलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्यांवर विश्वास
आम्ही आजही नव्या सदनिकेची आशा बाळगून आहोत. आमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल, अशी अपेक्षा आजही आहे. सदनिकेसंदर्भात मागील ९ वर्षांपासून आम्ही अनेक मंत्र्यांना शेकडो वेळा भेटलो, पत्रे दिली. मात्र, अध्याप कोणीच त्याची दखल घेतलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या घरी भेट दिली होती तेव्हा ते आमदार होते. आज ते मुख्यमंत्री झाले असून आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते नक्कीच सदनिका मिळवून देतील.
– मोनिका राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू

अविष्कार देशमुख

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International runners rohini monica still not get flat under cm quota
First published on: 29-04-2016 at 02:30 IST