मुख्यमंत्र्यांनी १५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते

शंभर टक्के दृष्टिहीन असलेली नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडेने मेक्सिको येथे झालेल्या दिव्यांगांच्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताला पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवून दिले. तिच्या या कामगिरीचे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मात्र, आज त्या घोषणेला सात महिने लोटले तरी कांचनमाला आपल्या हक्काच्या बक्षिसापासून वंचितच आहे.

कांचनमाला जन्मत: अंध असून ती मूळची अमरावतीची आहे. कांचनमालाने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात धडे गिरवले. जवळपास दहाहून अधिकवेळा आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. केवळ प्रतिनिधित्वच नाही तर दहा सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांची कमाईदेखील केली. जुल २०१७ मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरा स्वीमिंग स्पर्धेत कांचनमालाने सहभाग नोंदवला होता. त्यावेळी देखील शासनाने तिची थट्टा केली होती. सरकारने मंजूर केलेले पसे तिच्यापर्यंत वेळेत न पोहोचल्याने तिला बíलनमध्ये लोकांकडून भीक मागावी लागली होती.

या प्रतिकूल परिस्थितीतही तिने जिद्द कायम ठेवत देशासाठी रौप्यपदक पटकावत जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. याच कामगिरीने कांचनमालाला नवे बळ मिळाले आणि त्याच्याच जोरावर तिने दिव्यांगांच्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताला पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळवून देणारी कांचनमाला भारताची पहिली महिला जलतरणपटू ठरली. कांचनमालाने एस -११ श्रेणीत २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात सुवर्णकामगिरी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० डिसेंबर २०१७ रोजी नागपूर येथील रामगिरी बंगल्यावर कांचनमालाचा सत्कार केला आणि १५ लाख रुपयांचे बक्षीस सोबतच प्रथम श्रेणीतील नोकरी देण्याची घोषणा केली. मात्र, त्या घोषणेला आज सात महिने लोटले असून कांचनमाला आपल्या हक्काच्या बक्षिसापासून वंचित आहे.

‘सीएमओ’चे क्रीडा विभागाकडे बोट

याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडे विचारणा केली असता  कांचनमालाच्या बक्षिसाच्या प्रस्तावासंदर्भात क्रीडा विभागाकडे चौकशीचा सल्ला देण्यात आला.

पत्राला साधे उत्तरही नाही

यासंदर्भात कांचनमालाने पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलातील क्रीडा अधिकाऱ्यांना  सर्व प्रमाणपत्रे आणि आवश्यक ते सर्व कागद दिले. अधिकाऱ्यांनी ते सर्व दस्तऐवज शासनाच्या क्रीडा विभागाला पाठवले. त्यानंतर कांचनमालाने नियमित त्याचा पाठपुरावा केला. मात्र, क्रीडा विभागाने मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवले. मुख्यमंत्री कार्यालयात सध्या तिची फाईल धूळखात पडली आहे. या संदर्भात तिने अनेकदा मुख्यमंत्र्यांसह क्रीडा मंत्री विनोद तावडे यांना देखील पत्र पाठवले मात्र, दोन्ही मंत्री महोदयांनी पत्राला साधे उत्तर देण्याचेही कष्ट घेतले नाही. जागतिक पातळीवर देशाला सुवर्णपदक प्राप्त करून देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शहरातील खेळाडूला दिलेले आश्वासन मुख्यमंत्री पाळत नसल्याने क्रीडा वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे.

फेसबुक, ट्विटरवर बक्षिसाची घोषणा अजूनही कायम

११ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक आणि ट्विटरवर कांचनमालाचे अभिनंदन करतानाचे छायाचित्र टाकण्यात आले आहे. यात क्रीडा मंत्री विनोद तावडे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापटही दिसतात. मुख्यमंत्र्यांनी कांचनमालाला १५ लाखांचे बक्षीस आणि प्रथम श्रेणीतील नोकरी देण्याचे जाहीर केल्याचे त्यांच्या  फेसबुकवर वॉलवर नमूद आहे.