‘एक्सप्लोरिंग वूमनहूड’च्या संस्थापक दीपाली देवकर यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. पण, प्रत्येक महिलेमागे पुरुष खंबीरपणे उभा असेल तर ती स्त्री देखील तितकीच यशस्वी होऊ शकते. महिला आणि पुरुष अशी तुलना न करता तिचा गौरव, सन्मान झाला तर तेवढय़ाच ताकदीने ती कु टुंब आणि नोकरी अशा दोन्ही पातळीवर लढा देऊ शकते, असे मत आंतरराष्ट्रीय कं पनीतील उच्चपदस्थ नोकरी सोडून महिलांच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या ‘एक्सप्लोरिंग वूमनहूड’च्या संस्थापक दीपाली देवकर यांनी व्यक्त केले. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्या बोलत होत्या. मासिक पाळीविषयी अजूनही सुशिक्षित महिला समोर येऊन बोलत नाहीत. गावखेडय़ातील महिलांची तर गोष्टच वेगळी. पुण्यासारख्या शहरातून नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातील कमलापूरमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवले तेव्हा तिथल्या भाषेचाही गंध नव्हता. मग वसाहतीच्या चौकीदारांची मदत घेऊन त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात के ली. त्यातून अनेक गोष्टी उलगडत गेल्या आणि त्यांच्यासाठी काम करताना त्या अधिक सहजसोप्या होत गेल्या. गडचिरोली सोडून पेंच व्याघ्रप्रकल्पात आल्यावर तिथल्या महिलांशी हितगूज साधले. या काळात सॅनिटरी नॅपकीन कसे वापरायचे, त्याची विल्हेवाट कशी लावायची, त्याला पर्यायी मार्ग कोणता, त्यातून होणारे आजार याबाबत ग्रामीण महिला अनभिज्ञ होत्या. मग सॅनिटरी नॅपकीन वाटण्यापासून सुरुवात झाली. जंगलात काम करणाऱ्या महिला वनरक्षकांना या समस्या खऱ्या अर्थाने भेडसावतात. यावेळी सहज चर्चा करूनही त्यांचे बरेचसे प्रश्न सोडवता येतात. प्रामुख्याने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा  कसा विरोध करायचा, हे त्यांना माहितीच नसते. समुपदेशनादरम्यान दोन-दोन तास स्त्रिया बोलतात, तेव्हा त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावी लागते. अतिथी व्याख्याता म्हणून बोलताना असे अनेक प्रश्न समोर येतात. करोनाकाळात ग्रामीण महिलांनी तयार के लेल्या मुखपट्टय़ा, पिशव्या अप्रतिमच. त्यांना प्रशिक्षित के ले आणि व्यावसायिकता शिकवली तर त्या मोठय़ा उद्योजिकता होऊ शकतात. त्यादृष्टीनेच ‘एक्सप्लोरिंग वूमनहूड’काम करत आहे.   गडचिरोली जिल्ह्य़ातील रेपनपल्ली व पेंच व्याघ्रप्रकल्पात सर्पदंशाला सामोरे जावे लागले. त्यातून ग्रामीणांची उपचारपद्धती कशी जीवावर बेतू शकते हेही पाहिले आणि मग सर्पदंशावर मांत्रिक नाही तर उपचार महत्त्वाचे आहेत, यावर व्याख्याने दिली. प्राथमिक उपचार सुविधा त्यांना पुरवल्या. सर्पदंशामुळे मृत्यूची वेळ कु णावरही येऊ नये यासाठीच आता पेंच व्याघ्र प्रकल्पालगत रुग्णालयाची सुविधा के ली जात आहे.

‘मिसेस फॉरेस्ट ऑफिसर’

वनखात्याचा अधिकारी त्याच्या कार्यक्षेत्रात निघून जातो. कु टुंब आणि नोकरी अशा दोन पातळीवर कार्यरत त्या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मनात असणाऱ्या अनेक गोष्टी वेळेअभावी तिला कु णाजवळ बोलता येत नाही. मनात अनेक गोष्टी खोलवर दडलेल्या असतात. त्यावर व्यक्त होणे गरजेचे असते. अशा महिलांचे मनोगत ‘मिसेस फॉरेस्ट ऑफिसर’ या डायरीतून मांडायचे आहेत.

महिलांच्या अधिकारांबाबत ‘हँडबुक’

महिलांनाच त्यांच्या अधिकारांविषयी माहिती नसते. त्यांच्यासोबत काम करताना अनेक लहानसहान अधिकारांपासून त्या कोसो दूर असल्याचे जाणवले.  साध्या आणि सोप्या भाषेत त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणारे ‘हँडबुक’ तयार करायचे आहे, असेही  दीपाली देवकर यांनी सांगितले.