फडणवीसांचे गृहमंत्र्यांना पत्र

नागपूर : महापौर संदीप जोशी व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनिट्रॅप’मध्ये अडकवण्या संदर्भातील ध्वनीफित गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र प्रसारित होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पातळीवर याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,  यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरुद्ध हॅनिट्रॅपच्या कटकारस्थानाचा उल्लेख आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांचे नाव घेऊन त्यांच्या आशीर्वादाने गुन्हेगाराना अभय दिले जात असल्याचाही ध्वनीफितीत उल्लेख आहे. ज्या न्याय व्यवस्थेकडे आपण अतिशय पवित्र नजरेने पाहतो ती न्यायव्यवस्था मॅनेज करण्यासंदर्भातही उल्लेख त्यात आहे. असे अतिशय गंभीर आरोप व उल्लेख असल्याने या ध्वनीफितीची वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन त्यातील सत्य जनतेपुढे मांडण्याची गरज आहे. या प्रकरणी आपण उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्याल, असा  विश्वास फडणवीसांनी पत्रात व्यक्त केला आहे. दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांनी या ध्वनीफिती संदर्भात आज मंगळवारी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार केली.