गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हे शाखेच्या कामगिरीत मोठी घसरण झाली असून आता प्रत्येक पथकाला तपासाचे व गुन्हे उघडकीस आणण्याचे लक्ष्य (टार्गेट) दिले गेले आहे. पथकांच्या कामगिरीवर वरिष्ठ अधिकारी नाराज असून गुन्हे शाखेची कामगिरी उंचावण्यासाठी ही कसरत करण्यात येत आहे. या उपाययोजनेने गुन्हे शाखेच्या कामगिरीत किती सुधारणा होते, याकडे बघण्यासारखे असेल, हे विशेष.

पोलीस आयुक्तालयांतर्गत २९ पोलीस ठाणी असून शहराचा आकार व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या अनुषंगाने नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यात येते. गुन्हेगारीही दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस ठाण्यात आधीच मनुष्यबळाची कमतरता असते. अशात त्यांना पोलीस ठाण्यातील नियमित घडामोडी, बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था आदी जबाबदारी पार पाडावी लागते. पोलीस ठाण्यांतर्गत घडणाऱ्या  गंभीर गुन्ह्य़ांचा सखोल तपास करण्यासाठी व आरोपींना अटक करण्यासाठी गुन्हे शाखा ही स्वतंत्र यंत्रणा आहे. या शाखेतील कर्मचाऱ्यांकडे केवळ गुन्ह्य़ांचा छडा लावणे, आरोपींना अटक करणे, अहवालावरील आरोपींवर नजर ठेवणे, शहरातील अवैध व्यवसायांवर कारवाई करणे आदी स्वरूपाचे काम करतात.  परिमंडळानुसार गुन्हे शाखेचे पाच परिमंडळ तयार करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेला त्यांच्या परिमंडळातील गुन्हेगार व अवैध धंद्यांवर नजर ठेवता यावी, तसेच घटनास्थळी लवकर पोहोचण्याकरिता त्यांची कार्यालयेही परिमंडळांतर्गत आहेत. प्रत्येक परिमंडळात गुन्हे शाखेची दोन पथके आहेत. त्यांच्यावर नियंत्रणासाठी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक असे अधिकारी आहेत. मात्र, काही महिन्यांपासून गुन्हे शाखेच्या कामगिरीत घसरण झाली आहे. याची जाणीव गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम आणि सहाय्यक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांना झाली आणि त्यांनी आता अधिकारी व कर्मचाऱ्यांना लक्ष्य ठरवून दिले आहे.

पाच खुनांच्या तपासाने प्रश्नचिन्ह

मागील काही दिवसांमध्ये जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत २, वाडी पोलीस ठाण्यांतर्गत २ आणि बजाजनर पोलीस ठाण्यांतर्गत एक खून झाला. या खुनांचा छडा स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच लावला. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आता सर्व पथकांच्या कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत पातळीवर यश अपयश सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.

दरवर्षी ११ हजारांवर भादंविचे गुन्हे

खून, दरोडा, बलात्कार, खुनाचा प्रयत्न, अपहरण, हुंडाबळी, विनयभंग, सदोष मनुष्यवध आदी स्वरूपाच्या गंभीर घटनासह भादंवि अंतर्गत ११ हजारांवर गुन्हे घडतात. संपत्तीविषयक गुन्हे, जातीवाचक शिवीगाळ, हवाला व इतर कायद्यांतर्गत मोडणारे गुन्हे वेगळे असतात. त्यामुळे भादंविच्या भाग १ ते ५ अंतर्गत येणारे गुन्हे, आर्थिक फसवणूक, संपत्तीविषयक गुन्ह्य़ांच्या तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेवर येते. मात्र, यात गुन्हे शाखाचा आलेख घसरत असल्याने गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.

आता व्यक्तिगत कामगिरीचा आढावा

गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता गुन्हे तपास, आरोपी पकडणे, आरोपींवर लक्ष ठेवणे, प्रतिबंधात्मक कारवाई करणे, गुन्हेगारांची माहिती गोळा करणे आदी स्वरूपाची कामगिरी उंचावण्यासाठी लक्ष्य ठरवून दिले आहे. गुन्हे शाखेच्या प्रत्येक पथकातील काही कर्मचारी चांगले काम करतात. नेहमी पथकाच्या कामगिरीचे मूल्यमापन होते. यापुढे आता व्यक्तिगत कामगिरीचे मूल्यमापन होणार आहे.

संभाजी कदम, पोलीस उपायुक्त.