कारवाईच्या भीतीने लाखो बेचैन
आर्थिक गुन्हे शाखेने ‘डब्बा ट्रेडिंग’ व्यापाऱ्यांवर कारवाई केल्याने शहरातील व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कारवाईने डब्बा व्यापाऱ्यांबरोबरच त्यात गुंतवणूक करणारेही बेचैन झाले आहेत. गुंतवणूकदारांच्या मनात पोलिसांकडून आपल्याला अटक होण्याची भीती असून, गुंतवणूकदार आपासात सल्लामसलत करून यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत.
१२ मे रोजी आर्थिक गुन्हे शाखा आणि सेबीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील दहा डब्बा व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे टाकले. यात २१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, १० जणांना अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांनी शेकडो पोती दस्तावेज, १७ संगणक, ५ लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले. नागपूर हे डब्बा व्यापाराचे मध्यवर्ती केंद्र आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राचा व्यापार नागपुरात केंद्रीभूत आहे. त्यामुळे नागपुरातून चालणाऱ्या डब्बा व्यापाऱ्यात आजूबाजूच्या परिसरातील पाच लाखांवर गुंतवणूकदार गुंतवणूक करीत असल्याची माहिती समोर येत आहे. डब्बा व्यापाऱ्यांवर कारवाई होताच पोलिसांच्या तावडीत न सापडलेल्या इतर डब्बा व्यापाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. शिवाय पोलिसांच्या हाती डब्बा व्यापाऱ्यांचा प्रचंड दस्तावेज लागला आहे. या दस्तावेजातून गुंतवणूकदारांची ओळख पटेल आणि गुंतवणूकदारांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अधिक पैसा कमविण्याच्या लालसेतून या व्यापाऱ्यात गुंतवणूक करणारे गर्भश्रीमंत गुंतवणूकदार अस्वस्थ असून, आतापासूनच ते आपल्या वकिलांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. डब्बा व्यापाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या १७ संगणक आणि ५ लॅपटॉपमधील माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांनी खासगी संगणक तज्ज्ञांची मदत घेतली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही माहिती मिळविण्याचे काम सुरू असून, बहुतांश संगणकांच्या हार्डडिस्कमधील माहिती उघड झाली आहे. या प्रकरणाला अधिक बळकटी देण्यासाठी पोलीस भविष्यात अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सर्वाधिक गुंतवणूक व्यापाऱ्यांकडून
एक डब्बा व्यापारी दररोज १०० ते १५० कोटींचा व्यवहार करतो. यावरून त्यांच्याकडे येणारे गुंतवणूकदार हे गर्भश्रीमंत असल्याचे स्पष्ट होते. या व्यवसायात सर्वाधिक व्यापारी वर्गातील लोकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय नोकरदार वर्गाचे प्रमाण व्यापारी वर्गाच्या खालोखाल आहे. मध्यमवर्गीय लोक या व्यापाऱ्यापासून कोसो दूर आहेत.

गुंतवणूकदारांना समोर येण्याचे आवाहन
देशाच्या अर्थव्यवस्थेला बाधा पोहोचविणारा हा व्यवसाय आहे. देशाच्या विकासासाठी न्याय मार्गाने व्यवसाय होणे आवश्यक असून, अशा गैरमार्गाने पैसे कमावणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. अटक करण्यात आलेल्या किंवा गुन्हे नोंदविलेल्या डब्बा व्यापाऱ्यांकडून गुंतवणूक करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार नसून, त्यांना साक्षीदार करण्याचा विचार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी समोर येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी केले.