महापालिकेतर्फे शहरातील विविध भागातील रस्त्याचे सिमेंटीकरण केले जात असून विविध कंत्राटदारांच्या माध्यमातून जोमाने सुरू असलेल्या या कामांच्या संदर्भात आता अनेक अनियमितता निदर्शनास येत आहेत. काही ठिकाणी कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले तर काही ठिकाणी काम चांगले केले नसल्याचे आढळून आले आहे. सिमेंट रस्ते निकृष्ट पद्धतीने केले असल्याची यापूर्वी अनेक प्रकरणे उजेडात आली असताना आता दक्षिण नागपुरातील गजानन विद्यालय ते उदयनगर चौकापर्यंत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत सत्तापक्षाच्याच आमदारांनी शंका उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे.
राज्य सरकारने ३०० कोटी रुपये खर्चून सिमेंट रस्ते बांधण्याची घोषणा झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने सर्व सोपस्कार पार पडले. एका कंत्राटदाराला काम देण्यापेक्षा वेगवेगळ्या कंत्राटदारांना काम देण्याचे जाहीर केल्यानंतर त्याप्रमाणे निविदा काढल्या आणि कामांचे वाटप झाले. शहरातील सिमेंट रस्त्यांसाठी राज्य शासन शंभर कोटी, नागपूर सुधार प्रन्यास १०० कोटी आणि महापालिका १२४ कोटी रुपये खर्च करून एकूण ३२४ कोटींच्या निधीतून विविध भागात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. सहा महिन्यांनी महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे ही कामे तातडीने होण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू असले तरी काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचे आढळून आले आहे. या कामाच्या गुणवत्तेवर भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कोहळे यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण नागपुरातील गजानन विद्यालय चौक ते उदयनगर या चौकापर्यंत तयार करण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत त्यांनी रोष व्यक्त केला. निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची या भागातील नागरिकांची ओरड होत असल्यामुळे कोहळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असताना वस्तुस्थिती समोर आली. या भागात कमी व्यासाचे पाईप टाकण्यात येत असल्यामुळे भविष्यात नळलाईन, गडरलाईन व अन्य लाईन टाकताना अडचणी येण्याची शक्यता आहे. कोहळे यांनी त्वरित हे पाईप बदलविण्याचे व कामाची गुणवत्ता सुधारण्याचे निर्देश दिले. यापूर्वी अशोक चौक ते रेशिमबाग चौक दरम्यान करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या निकृष्ट कामांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. रस्ता तयार केल्यानंतर दोन महिन्यातच उखडल्याचे लक्षात आले होते. त्या रस्त्याच्या चौकशीचे आदेश दिले होते, मात्र अजूनपर्यंत काही झाले नाही. कामाच्या दर्जाबाबत महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याची ओरड सर्वत्र ऐकू येते. निवडणुकीपूर्वी कामे करायची असल्याने घाईघाईने रस्त्याची कामे केली जात असली तरी त्या कामांबाबत सत्तापक्षाच्याच नेत्यांकडून आता शंका उपस्थित केली जात आहेत. अनेक कामे काळ्या यादीतील कंत्राटदारांना देण्यात आली होती. रस्त्याच्या बाबतीत भाजप आमदाराने हा रस्त्याच्या घोळ समोर आणल्यामुळे महापालिका प्रशासनाची आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

गजानन विद्यालय ते उदय नगर चौकादरम्यान सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे या कामाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यात यावी आणि तातडीने या कामाची तपासणी करून संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
– सुधाकर कोहळे, आमदार व भाजप शहर अध्यक्ष