मिहानमधील ‘एचसीएल कॅम्पस’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; पहिल्या टप्प्यात दोन हजार युवकांना रोजगाराचे लक्ष्य

मुंबई आणि पुणे या शहरासोबतच राज्यातील इतर शहरातही माहिती तंत्रज्ञान उद्योग सुरू व्हावेत, यासाठी आयटी धोरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळेच नागपुरात आयटी उद्योग मोठय़ा प्रमाणात सुरू होत असून एचसीएल देखील त्याच्याच एक भाग आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीजने मिहानमध्ये कॅम्पस विकसित केले असून त्यांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, एचसीएलचे संस्थापक व अध्यक्ष शिव नाडर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार उपस्थित होते.

आयटी उद्योगासाठी राज्यातील नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक ही शहरे देखील सुयोग्य असून या शहरांकडे आयटी उद्योजकांनी वळावे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मिहानमध्ये एचसीएल सुरू होत आहे. या कंपनीने खूप वर्षांपूर्वी मिहानमध्ये जमीन खरेदी केली होती. मात्र, त्यांना येथे प्रकल्प सुरू करण्यात फारसा रस नव्हता. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रयत्नाने एचसीएलला येथे प्रकल्प सुरू करण्याचे प्रोत्साहन मिळाले, असेही फडणवीस म्हणाले.

मिहानमधील ५० एकरमध्ये पसरलेल्या एचसीएल कॅम्पसचे उद्दिष्ट, केंद्रामध्ये काम सुरू झाल्यानंतर दोन हजारहून अधिक रोजगार निर्मिती करणे आहे. एचसीएलने आधीच ३०० उमेदवारांना प्रस्ताव पत्र पाठवले आहे आणि १०० स्कॉलर्स सध्या प्रशिक्षण घेत आहेत. उद्घाटन कार्यक्रमाला पहिल्या तुकडीचे स्कॉलर्स आपल्या कुटुंबासोबत हजर होते.

‘एचसीएल’ अशी आहे

एचसीएलची १९७६ मध्ये स्थापना झाली. या कंपनीने १९७८ मध्ये ८-बीट मायक्रोप्रोसेसर आधारित संगणक सुरू केला. एचसीएल एन्टरप्राईज तंत्रज्ञान, आरोग्य सेवा आणि प्रतिभा व्यवस्थापन केंद्र यासारख्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि यात तीन कंपन्या आहेत. एचसीएल इन्फोसिस्टीम, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि एचसीएल हेल्थकेअर ही एन्टरप्राईज सुमारे ७.५ अब्ज अमेरिकी डॉलर्सची वार्षिक कमाई करते आणि ३९ देशांमध्ये १४० राष्ट्रीयत्वाच्या १२० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देते, ज्यामध्ये भारतातील ५०० हून अधिक केंद्र देखील आहेत.

फिनटेक धोरणाची घोषणा

मुख्यमंत्र्यांनी फिनटेक धोरणाची घोषणा केली. ते म्हणाले, राज्य सरकारची फिनटेक धोरण आखणाची योजना आहे. यातून इच्छुकांना कुशल मनुष्यबळात रूपांतरित केले जाईल. युवकांना अधिकाधिक रोजगार मिळावे म्हणून राज्यातील विविध शहरात आयटी टॉऊनशिप तयार करण्याचाही विचार सुरू आहे. आर्थिक सेवा देण्याच्या पारंपरिक पद्धतीत नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन आणण्याची पद्धती फिनटेक आहे. नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक येथे अशा टॉऊनशीप तयार करण्याचा विचार आहे.

नागपूर आयटी हब जागतिक नकाशावर येणार

एचसीएलचे नागपूर केंद्र हे महाराष्ट्रातील तिसरे आहे. यापूर्वी मुंबई आणि पुणे येथे असे केंद्र आहे. या प्रकल्पाचे नऊ महिन्यांपूर्वी भूमिपूजन झाले. तेव्हाच स्थानिकांची नियुक्ती प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली. यातील ३०० उमेदवारांना प्रस्ताव पत्र देण्यात आले आहे. पहिल्या तुकडीतील उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू आहे. सुमारे दोन हजार स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे. येत्या काही दिवसात नागपूर शहर आयटी हब म्हणून जागतिक नकाशावर येईल, असा विश्वास एचसीएल टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी संचालक सी. विजयकुमार यांनी व्यक्त केला.

काँग्रेस नेत्यांना मुलांच्या नोकरीची चिंता -गडकरी

विदर्भात नैसर्गिक साधन-सामग्री मोठय़ा प्रमाणावर आहे. परंतु गरिबी, बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या येथे होत आहे. मागील सरकारमधील नेत्यांनी त्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे काम केले. मात्र, येथे उद्योग आणले नाही. आम्ही तसे नाही. माझी दोन्ही मुले व्यवसायात आहेत, तर मुख्यमंत्र्यांना एकुलती एक मुलगी आहे. आमच्या राजकारणाचा उद्देश लोकांना रोजगार उपलब्ध करणे हा आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले.