News Flash

सरकारी रुग्णालयात आधुनिक सेवा देणे अशक्य

शासकीय रुग्णालयांत सरकारी चौकटीत राहून खासगी रुग्णालयासारख्या आधुनिक सेवा देणे शक्य नाही,

राष्ट्रीय कॅन्सर संस्थेची पाहणी करतांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर.

* केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची कबुली * राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिटय़ूटचे उद्घाटन

शासकीय रुग्णालयांत सरकारी चौकटीत राहून खासगी रुग्णालयासारख्या आधुनिक सेवा देणे शक्य नाही, त्यामुळे खासगी व सार्वजनिक भागीदारीतून रुग्णालयांची उभारणी करावी, यासाठी चांगल्या संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. सरकारी कामकाज पद्धतीवरही त्यांनी ताशेरे ओढले.

जामठा येथील राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिटय़ूटच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, केंद्रीय ऊर्जा व कोळसा खात्याचे मंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे संकेतस्थळ आणि रुग्णांकरिता ‘सेल्फ केयर किट’चे लोकार्पण करण्यात आले.

सरकारी रुग्णालयात अद्ययावत सेवा रुग्णांना मिळणे अपेक्षित असते, मात्र तसे होत नाही. सरकार म्हणून काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कधी नियमांची अडचण तर कधी निधी व कुशल मनुष्यबळाचा तुटवडा असतो, याचा फटका रुग्णसेवेला बसतो. ही समस्या कायमची सोडवायची असेल तर खाजगी- सार्वजनिक भागिदारीतून रुग्णालय चालवणे हा पर्याय आहे. त्याकरिता चांगल्या सामाजिक संस्थांनी पुढे यायला हवे. अशा रुग्णालये उभी करावी लागेल. तेथे  सुमारे ६० टक्के गरिबांना अल्प तर इतरांना व्यवसायिक दरात उपचार देण्याची सुविधा निर्माण करावी तरच चांगल्या वैद्यकीय सेवा मिळू शकेल. मुंबईत अशा प्रकारचा प्रयोग केला जात आहे. पोर्ट ट्रस्टची १७ एकर जागा एका सामाजिक संस्थेला १ रुपया  नाममात्र दरात देऊन सुपरस्पेशालीटी रुग्णालय सुरू करण्याचे प्रयत्न आहे. तेथे गरिबांना अल्प दरात सुविधा मिळतील.  नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या कर्करोग रुग्णालयामुळे या भागातील रुग्णांची सोय होईल, असे गडकरी म्हणाले.

विदर्भातील रुग्णांची सोय -मुख्यमंत्री

वडिल गंगाधरराव फडणवीस यांना कर्करोग होता. त्याच्यावरील उपचाराच्या निमित्ताने मुंबईच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात जाण्याचा प्रसंग अनेक वेळा आला. त्यामुळे विदर्भाच्या रुग्णांना होणाऱ्या वेदना बघता आल्या. तेव्हांच नागपूरला रुग्णालय उभारण्याचे निश्चित केले. शैलेश जोगळेकर यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. टप्प्या टप्प्याने ही इन्स्टिटय़ूट मोठी होवून तेथे मध्य भारतातील रुग्णांना अद्यावत वैद्यकीय सेवा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपचार दीर्घकाळ चालत असल्याने नातेवाईकांना राहण्यासाठी आश्रम शाळेसह इतर सुविधा संस्थेकडून उपलब्ध केल्या जाईल, असेही त्यांनी सांगितले.

भारतात उपचार सुविधांचा अभाव -टाटा

कर्करोग कोणालाही होऊ शकतो, माझे माता-पिताही याच आजाराने दगावले. दुर्दैवाने भारतात या आजारावर उपचारासाठी पुरेशा सुविधा नाहीत. वेळीच निदान न होणे, उपचार न मिळणे या व तत्सम कारणांमुळे रुग्ण दगावतात. यासाठी उपचार सुविधा वाढवून ते माफक दरात उपलब्ध करून दिल्यास त्याचा गरीब  रुग्णांना फायदा होईल. टाटा संस्थेकडून नेहमीच कर्करुग्णांच्या उपचाराकरिता मदत केली जाते. नागपूरच्या राष्ट्रीय कॅन्सर संस्थेलाही मदत केली जाईल, असे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 1:01 am

Web Title: it is impossible to give modern services in government hospitals says nitin gadkari
टॅग : Nitin Gadkari
Next Stories
1 देशातील पहिली हेल्थ मेडिसिटी नागपुरात
2 निवासी प्लॅटफॉर्म शाळेत भाजपचे जनसंपर्क कार्यालय
3 संवेदनशील नागरिक घडविण्याचा संवेदना परिवार संस्थेचा प्रयत्न!