17 December 2017

News Flash

आयटी क्षेत्रातील व्यावसायिकांचा भावनिक बुद्धय़ांक फारच कमी

आयटी क्षेत्रातील महिलांचा भावनिक  बुद्धय़ांक आयटी क्षेत्रातील पुरुषांपेक्षा कमी आढळतो.

प्रतिनिधी, नागपूर | Updated: October 13, 2017 1:45 AM

प्रातिनिधिक छायाचित्र

आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे व्यावसायिक आणि इतर क्षेत्रातील व्यावसायिकांच्या भावनिक बुद्धय़ांकामध्ये कमालीची तफावत असून आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांचा भावनिक बुद्धय़ांक सर्वात कमी असतो. पुरुष आणि महिलांची तुलना केल्यास महिलांचा भावनिक बुद्धय़ांक कमी असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

आयटी कंपन्यांतील व्यावसायिकांच्या भावनिक बुद्धय़ांकावर प्रकाश टाकणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच संशोधन आहे. डॉ. वृषाली राऊत यांच्या पीएच.डी.चा हा विषय होता आणि त्यांना कामठीच्या समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. रुबिना अन्सारी यांनी या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. राऊत यांनी लिंग आणि व्यवसायनिहाय भावनिक बुद्धय़ांकाचे संदर्भ त्यांच्या संशोधनादरम्यान शोधले. त्यात त्यांना आयटी क्षेत्रातील महिलांचा भावनिक  बुद्धय़ांक आयटी क्षेत्रातील पुरुषांपेक्षा कमी आढळतो. मात्र, इतर व्यवसायांशी तुलना केल्यास आयटी क्षेत्रातील पुरुषांचा भावनिक बुद्धय़ांकही कमी असतो. लाखो रुपयांचे आकर्षक पॅकेज आणि झगमगाटी जीवनशैली पाहून तरुणाई आयटी कंपन्यांकडे आकृष्ट होते. मात्र, या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांचे जीवन तणावाने ग्रासलेले आणि यंत्राप्रमाणे झालेले असते. त्याचे परिणाम समाज, कुटुंब आणि त्या व्यक्तीवरही होत असतो. महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. मिळण्यापूर्वीच डॉ. राऊत यांना बर्लिन येथे मुख्यालय असलेल्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीने नोकरी देऊ केली आणि त्यांच्या पीएच.डी. दरम्यानच्या शिफारशीही त्या कंपनीने लागू केल्या.

आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तासन्तास संगणक, लॅपटॉपवर काम करण्याने मानवी भावनांवर खोलवर परिणाम होत असतो.

कोणतीही मशीन कीबोर्डच्या एका बटनावर प्रतिसाद देते आणि ते नियंत्रितही करता येते. माणसांना असे करता येत नाही. त्यामुळेच भावनिक बधिरता आणि एखाद्या दु:खद घटनेविषयी आयटी व्यावसायिकांमध्ये सहानुभूतीचा अभाव मोठय़ा प्रमाणात दिसून येतो. भावनिक  बुद्धय़ांकाच्या अभावाने एकाकीपणा येऊन निराशा आणि नंतर आत्महत्या या क्षेत्रात होतात. शिवाय तासन्तास बसून राहण्यातून लठ्ठपणा, नपुंसकता, अतिताण, मधुमेहासारखे आजार आयतेच गळ्यात पडतात.

आपल्या शिक्षण पद्धतीत विज्ञान आणि इंग्रजी या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. घर आणि शाळेतील संस्कारातून भावनिक बुद्धय़ांकाचा विकास होत असतो. कारण व्यक्तीच्या भावनिक बुद्धय़ांक वाढीसाठी असा ठरावीक निकष नाहीच, पण शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर वेगवेगळ्या वयोगटातील मुलांमध्ये ‘सायकोमेट्रिक असेसमेंट’ करून हा बुद्धय़ांकमोजता येतो. शिक्षण क्षेत्रात लहान मुलांमध्ये भावनिक विकास वाढी संदर्भात काही उपक्रम निश्चितच शाळांनी करायला हवेत. त्यासाठी समुपदेशकाची गरज लागणारच.

डॉ. वृषाली राऊत, व्यवस्थापक, मनुष्यबळ विकास, पुणे

First Published on October 13, 2017 1:45 am

Web Title: it professionals mental level