महेश बोकडे

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका आयटीआय उत्तीर्णाना (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) बसण्याची चिन्हे आहेत. आयटीआय उत्तीर्णाना एक वर्षांची इंटर्नशिप झाल्यावर कौशल्य विकास मंत्रालयाची परीक्षा द्यावी लागते. यातील गुणांच्या आधारे नोकरीसाठी अर्ज करता येतो. मंत्रालयाने डिसेंबर, २०१८ मधील परीक्षेच्या गुणपत्रिका अद्याप दिल्या नसल्याने उत्तीर्णाना महावितरणच्या १० जुलैपासून सुरू होणाऱ्या सरळ सेवा भरतीला मुकावे लागणार आहे.

आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते.  विद्यार्थ्यांच्या शाखेनुसार मंत्रालय विविध कंपन्यांमध्ये त्यांना इंटर्नशिपसाठी पाठवते. इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांला मंत्रालयाची परीक्षा द्यावी लागते. डिसेंबरमधील परीक्षेची गुणपत्रिका अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नसल्याने त्यांच्यासमोर नोकरीची संधी गमावण्याचा धोका आहे.

विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधल्यावर त्यांना उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण एवढीच माहिती देण्यात येते. गुणपत्रिका ही इंटर्नशिप झालेल्या केंद्रावर मिळणार असल्याचे सांगण्यात येते. तेथे मात्र संकेतस्थळावर अद्याप गुणपत्रिका अपलोड झाली नसल्याचे सांगण्यात येते. त्यातच महावितरणकडून विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक पदांसाठी १० ते २४ जुलै दरम्यान सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गुणपत्रिका आवश्यक आहे. मात्र, गुणपत्रिका नसल्याने हे विद्यार्थी या भरतीला मुकण्याची चिन्हे आहेत.

नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने कौशल्य विकास मंत्रालयाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. एकदा गुणपत्रिका संकेतस्थळावर टाकल्याचा दावा केला गेला. त्यानंतर या क्रमांकावर संपर्कच होत नाही. संकेतस्थळावरील ऑनलाईन तक्रारींनाही प्रतिसाद मिळत नाही.

पाठपुरावा सुरू

उत्तीर्णाच्या गुणपत्रिकेबाबत कौशल्य विकास मंत्रालय व इतरांकडे पाठपुरावा सुरू आहे. भरतीवेळी महावितरणला उत्तीर्ण झाल्याचे संकेतस्थळावरील प्रमाणपत्र दाखवल्यास त्यांचा प्रश्न सहानुभूतीच्या आधारे सुटू शकतो.’’

– श्रीमती एम.डी. भामरे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक.