पालकमंत्र्याच्या भावाला १७० कोटींचे कंत्राट

शहरातील विविध भागातील रस्त्यांची अवस्था बघता नव्याने डांबरी रस्ते तयार करण्यात येणार आहे. या कामाचे १७० कोटींचे कंत्राट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भावाच्या नावाने असलेल्या ‘जगदंबा कन्सट्रक्शन’ कंपनीला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. या संदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. कोराडीच्या देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक खणा-नारळाची ओटी भरतात. महापालिकेने कोराडीच्याच ‘जगदंबा’ कन्सट्रक्शनची वेगळ्या पद्धतीने ओटी भरण्याचा प्रयत्न केला आहे.

पावसामुळे रस्त्यावरील डांबर उखडत असल्याने रस्त्याची अवस्था दयनीय होते. दरवर्षी महापालिका या रस्त्यांचे डांबरीकरण करते. यंदाही अशाच प्रकारची कामे केली जात आहेत.

१७० कोटींच्या रस्त्यांच्या कामासाठी पालकमंत्र्याचे भाऊ नंदकिशोर कृष्णराव बावनकुळे यांच्या जगदंबा कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड प्रशासनाने केली आहे. या कामासाठी प्रशासनाकडे चार निविदा आल्या होत्या. त्यापैकी जगदंबाची निविदा कमी दराची असल्यामुळे स्वीकारण्यात आली, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

यापूर्वी शहरातील काही भागातील डांबरी रस्त्यांची कामे या कंपनीला देण्यात आली होती. कामाबाबत तक्रारी आल्या होत्या. असे असताना पुन्हा ‘जगदंबा’ कंपनीला कामे देण्याचे औचित्य काय, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. प्रभाग क्रमांक ६७ मधील मानेवाडा एकमत नगर संरक्षण भिंतीच्या २८ लाख ३२ हजार रुपयाच्या कामाची निविदा राजेश रंगारी यांच्या नावाने आहे. रंगारी हे बावनकुळे यांचे कार्यकर्ते असून जगदंबा कन्सट्रक्शनशी संबंधित आहे.

नेत्यांच्या नातेवाईकांना स्थानिक स्वराज्य संस्थांची कामे देण्यात येत असल्याने यापूर्वी वादंग उठले होते. त्यानंतर भाजपने दोन वर्षांपूर्वी त्याबाबत धोरण ठरवून नेत्यांच्या नातेवाईकांना कामे देऊ नये असे ठरले होते. मात्र, त्याला बगल देऊन रस्त्यांची कामे देण्यात आली आहेत.

रस्त्यांची कामे

  • सिमेंट गोडाऊन, वाडेकर नगर रस्ता – ३५ कोटी ७३ लाख ९३३ (प्रभाग क्रमांक ६१)
  • रस्ता – ३८ कोटी ३६ लाख ००९ (प्रभाग क्रमांक ६१)
  • संकल्प गृह. संस्था कीर्तीनगर रस्ता – ६७ कोटी ४३ लाख ९५२(प्रभाग क्रमांक ६१)
  • खामले ले आऊट्स सर्वश्रीनगर रस्ता – ३२ कोटी ४ लाख २१६ (प्रभाग क्रमांक ६१)
  • एकमत नगर संरक्षण भिंत बांधकाम – २८ लाख ३२ हजार ५६३ (प्रभाग क्रमांक ६७)

डांबरी रस्त्याच्या कामासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यात कोराडीच्या जगदंबा कन्स्ट्रक्शनची निविदा सर्वात कमी दराची होती. त्यामुळे ती स्वीकारण्यात आली. स्थायी समितीसमोर शुक्रवारी मंजुरीसाठी हा विषय येणार असून त्यावर चर्चा होईल. त्यानंतर मंजुरी दिली जाणार आहे. पालकमंत्र्याच्या भावाची कंपनी आहे म्हणून कामांना प्रशासकीय मान्यता दिली, असे नाही.

संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका