राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे (एनटीए) आतापर्यंत ‘जेईई मुख्य परीक्षा २०२१’ची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम व अन्य माहिती नसल्याने राज्यातील विद्यार्थी अस्वस्थ आहेत.

या वर्षी करोनामुळे  १२वीच्या अभ्यासक्रमापासून शैक्षणिक धोरणापर्यंत सर्व काही बदलले आहे. अशा परिस्थितीत आगामी शिक्षण मंडळ आणि जेईई मुख्य परीक्षा कशी असेल, याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत आहे.

दरवर्षी ‘एनटीए’तर्फे ऑगस्ट महिन्यातच जानेवारीत होणाऱ्या जेईई मुख्य परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाते. पण आता नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी ‘एनटीए’ची अधिसूचना आलेली नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवरून विद्यार्थी एनटीएला या संदर्भात घोषणा करण्यासाठी सतत आग्रह करीत आहेत.

जुलै महिन्यात ‘सीबीएसई’ने इयत्ता ९वी ते १२वीपर्यंतचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी केला. परंतु एनटीएने अद्याप जेईई अभ्यासक्रम कमी करण्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यातही अडचणी येत आहेत.

परीक्षेचा अभ्यासक्रमच निश्चित नसल्याने कुठल्या विषयाचा अभ्यास करावा, कुणाला अधिक महत्त्व द्यावे, अशा संभ्रमात विद्यार्थी आहेत.

एकदाच परीक्षेची शक्यता

* जेईईची पहिली परीक्षा जानेवारीत, तर दुसरी एप्रिलमध्ये घेतली जाते. विद्यार्थी दोन्ही वेळा परीक्षा देऊ शकतात. दोघांपैकी ज्यामध्ये सर्वाधिक गुण आहेत, त्या आधारावर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

* मात्र या वेळी करोनामुळे शिक्षण मंडळाच्या परीक्षांनंतर फक्त एकदाच जेईई मुख्य परीक्षा होणार असल्याची चर्चा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आहे.

* यासंदर्भात ‘एनटीए’ने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण अथवा सूचना दिलेली नाही. परीक्षार्थी, पालक आणि शिक्षक अधिकृत घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत.