|| देवेश गोंडाणे

०.९ टक्के आयआयटीत, वैद्यकीयला केवळ ७.५६ टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश, खासगी शिकवणीचालक श्रीमंत

आयआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी दरवर्षी देशभरातून २४ लाख विद्यार्थी ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षा देतात. मात्र, यातून केवळ दीड लाख विद्यार्थीच आयआयटी, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकतात. २४ लाखातील २२ लाख विद्यार्थी हे कुठल्याही नामवंत संस्थेत प्रवेश मिळवू शकत नाहीत.

२४ लाखातील सर्वच जण शिकवणी वर्गाला (क्लास) जातात असे नाही, मात्र शिकवणी वर्गाला जाणाऱ्यांची संख्याही कमी नाही. लाखो रुपये घेऊन शिकवणी वर्ग चालवणाऱ्यांकडून आयआयटी आणि वैद्यकीय प्रवेश मिळेलच असे स्वप्न पालक व विद्यार्थ्यांसमोर रंगवले जाते. मात्र, शिकवणी लावूनही हजारो विद्यार्थ्यांना नामवंत शाखेत प्रवेश मिळत नाही, शिकवणी वर्गाच्या संचालकांची मात्र चांदी होत आहे.

यावर्षी देशभरातून ११ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट तर ११ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षा दिली. या दोन्ही परीक्षांसाठी देशभरात खासगी शिकवणी वर्गाचे जाळे पसरले आहे. प्रत्येक शिकवणी वर्गाचे शुल्क हे किमान दोन ते तीन लाखांच्यावर आहे. शिकवणीमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला आयआयटी आणि वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याचे स्वप्न दाखवले जाते. मात्र शिकवणी वर्गामधून निघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालाची आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आकडेवारी या शिकवणी वर्गाची पोलखोल करणारी आहे.

देशभरातून नीट परीक्षा देणाऱ्या ११ लाख ३८ हजारमधून केवळ ८६ हजार ११५ विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाला प्रवेश मिळाला असून त्यांचा टक्का ७.५६ इतका आहे. जेईई परीक्षा देणाऱ्यांची स्थिती तर याहून भयंकर आहे. जेईई देणाऱ्या ११ लाख ६० हजार विद्यार्थ्यांमधून २ लाख २४ हजार विद्यार्थ्यांची जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी निवड करण्यात आली होती. यातील केवळ १० हजार ५७२ विद्यार्थ्यांनाच आयआयटीला प्रवेश मिळवता आला. ही टक्केवारी केवळ ०.९ टक्के आहे. काही विद्यार्थी हे एनआयटी आणि अन्य राष्ट्रीय संस्थेत प्रवेश मिळवू शकले तरी त्यांनी संख्या ही ३० हजारांवर नाही. त्यामुळे राष्ट्रीय संस्थांमधून अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न रंगवून लाखो रुपयांचे शिकवणी लावून बसलेल्या ११ लाख ६० हजार विद्यार्थ्यांमधून केवळ ४० हजार मुले ही राष्ट्रीय नामांकित संस्थेत प्रवेश मिळवण्यात यशस्वी होत आहेत. यामुळे नीट आणि जेईईसाठी देशभरात परीक्षा देणाऱ्या १८ लाख विद्यार्थ्यांना स्वप्न दाखवण्याचे काम शिकवणी वर्ग करीत असल्याचे वास्तव आहे.

२२ लाख विद्यार्थी दिशाहीन

बारावीनंतरही अभियांत्रिकी, वैद्यकीय याशिवाय अनेक अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येते. मात्र, आयआयटी किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळवू शकलेल्या लाखो विद्यार्थ्यांना शिक्षाणाची योग्य दिशाच मिळत नसल्याचे या आकडेवारीवरून सिद्ध होते.

सरकारचा वचक नाही

देशभरात शिकवणी वर्गाचे लोण पसरले असून कनिष्ठ महाविद्यालये ओस पडली आहेत. शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांची साठगाठ असल्याने प्रात्यक्षिक परीक्षेशिवाय विद्यार्थी महाविद्यालयात भटकतही नाहीत. एकूण शिक्षण व्यवस्था विस्कळीत करणाऱ्या शिकवणी वर्गावर  सरकारचे कुठलेही नियंत्रण नसल्याने खोटय़ा स्वप्नांच्या नावावर पालकांची लूट सुरू आहे.

देशामध्ये वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयामध्ये एकूण ८६ हजार ११५, १६ आयआयटीमध्ये १० हजार ५७२ तर ३२ एनआयटीमध्ये १७ हजार जागा आहेत. यामध्ये बीटीटीएसएटी पीलानी आणि अन्य नामवंत राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांच्या जागा मिळून केवळ ४० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.