* सराफा व्यावसायिकांच्या बंदचा ग्राहकांना फटका  * वाहने, घर खरेदीसाठी बाजारात लगबग
चैत्र महिन्यातील नव्या वर्षांचा पहिला दिवस वर्षप्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीच्या मान्यतेप्रमाणे अत्यंत पवित्र अशा साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सोने-चांदीची खरेदी करण्याची परंपरा असताना या परंपरेला मात्र सराफा व्यावसायिकांच्या बंदमुळे खंड पडण्याची शक्यता आहे. मात्र वाहन खरेदी, नवीन घरासाठी नोंदणी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी यासाठी बाजारपेठा सजलेल्या आहेत.
दिवाळी आणि दसराप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक लोक सोने-चांदीची खरेदी करीत असल्यामुळे दरवर्षी नागपुरात मोठी उलाढाल होत असते. यावेळी केंद्र सरकारने उत्पादन शुल्कासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात विदर्भातील सराफा असोसिएशनने गेल्या ३६ दिवसांपासून बंद पुकारला असल्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सराफा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी इतवारी, धरमपेठ, गोकुळपेठ, महाल या भागातील सोने व्यावसायिकांकडे लोकांची खरेदीसाठी गर्दी असते. आज मात्र प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आल्यामुळे त्याचा फटका आता ग्राहकांना बसला आहे. काही ग्राहक ठराविक सराफा व्यावसायिकांकडून दरवर्षी सोने खरेदी करीत असतात. अनेकांनी संबंधित सराफा व्यावसायिकांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी सोने विक्रीस नकार दिला आहे. यापूर्वी सराफा व्यावसायिकांनी गेल्यावर्षी एक महिना संप पुकारला होता. मात्र, त्यावेळी कुठलाही सण नव्हता मात्र यावेळी सराफा व्यावसायिकांच्या इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याच्या दिवशी दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. इतवारीमध्ये दागिन्यांना पॉलिश करणारे बसलेले असतात. मात्र ते सुद्धा संपावर असल्यामुळे त्याचाही फटका ग्राहकांना बसला आहे.
दरम्यान, सराफा बाजार बंद असला तरी दुचाकी, कार आदी वाहने खरेदीसाठी अनेकांनी उद्याचा मुहूर्त निश्चित केला आहे. नवीन फ्लॅट बुक करण्यासाठीही ग्राहकांची पाडव्यालाच पसंती आहे, त्यामुळे या क्षेत्रात लाखोंची उलाढाल अपेक्षित आहे.

व्यवसायाला फटका
दिवाळीला धनत्रयोदशीला किंवा दसऱ्याप्रमाणे लोक गुढीपाडव्याला सोने खरेदी करीत असतात. साधारणत: विदर्भात अंदाजे २०० किलो सोने आणि ३०० किलो चांदी आणि अन्य दागिन्यांची विक्री होत असते मात्र, यावेळी केंद्र सरकारने अबकारी करासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे सराफांना गुढीपाडव्याला दुकाने बंद ठेवणे परवडणारे नाही तरीसुद्धा उद्या सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
राजू अरमरकर, सराफा असोशिएशनचे पदाधिकारी, नागपूर</strong>