29 March 2020

News Flash

रोजगार मागणारे नव्हे,  रोजगार देणारे बना!

जेवढे रोजगार देणारे निर्माणा होतील तेवढय़ा नोकऱ्या वाढतील असेही ते म्हणाले.

  •  नितीन गडकरी यांचे आवाहन
  • ‘यूथ एम्पावरमेंट समिट’चे उद्घाटन

नागपूर : आपल्याला रोजगार मिळाला म्हणजे देशासमोरील प्रश्न सुटला असे मुळीच नाही. त्यामुळे रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युवकांना केले. जेवढे रोजगार देणारे निर्माणा होतील तेवढय़ा नोकऱ्या वाढतील असेही ते म्हणाले.

फॉच्र्युन फाऊंडेशन, सूक्ष्म, लघु व मध्यम विकास संस्था, इंजिनिअरिंग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन आणि नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आमदार निवास सिव्हिल लाईन्स येथे आयोजित सहाव्या यूथ एम्पावरमेंट समिट या रोजगार मेळाव्याचे उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून गडकरी बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, फॉच्र्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार प्रा. अनिल सोले, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर संदीप जोशी, माजी खासदार दत्ता मेघे, अजय संचेती उपस्थित होते. युवकांनी आपल्या कौशल्याच्या आधारे  उद्यमशीलतेचा विकास करावा. आपल्या देशामध्ये वित्तीय व्यवस्थापन, कार्मिक व्यवस्थापना बरोबर उद्यमशीलता व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे, असेही गडकरी म्हणाले.  देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेत वित्तीय तसेच हॉस्पिटॅलिटी या सेवा क्षेत्रामध्ये अमाप संधी उपलब्ध असून तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या युवकांना रोजगाराच्या पुष्कळ संधी उपलब्ध आहेत. उद्योगांना रोजगारक्षम युवा मिळत नाही तर युवकांना अपक्षेप्रमाणे रोजगार मिळत नाही. अशा दोन्ही घटकांना या परिषदेच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा एक चांगला प्रयत्न होत आहे, असे त्यांनी सांगितले. विदर्भात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाच्या संधी उपलब्ध होत असून युवकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. १६ फेब्रुवारीपर्यंत आमदार निवास सिव्हिल लाईन्स येथे आयोजित या समिटमध्ये उद्यमशील युवावर्गासाठी कर्तृत्ववान मान्यवरांचे प्रेरक मार्गदर्शन परिसंवाद, सरकारी महामंडळ आणि शासकीय योजनांचे ४० पेक्षा जास्त माहिती दालने आहेत. या समिटच्या माध्यमातून, पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यंमधून अठरा हजारांवर उमेदवारांनी नावनोंदणी केली आहे हे विशेष.

खादी जिन्सच्या निर्मितीसाठी पुढे या

नागपुरातील मिहान प्रकल्पामध्ये आतापर्यंत ३३ हजार युवकांना रोजगार उपलब्ध झाला असून मदर डेअरी सारख्या प्रकल्पामधून स्वयंरोजगार मिळत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. रोजगाराच्या संदर्भातील मार्गदर्शन व रोजगार उपलब्ध करून देणाऱ्यांसोबत समन्वय संवाद आणि सहकार्य या युवा समिटद्वारे होत आहे. खादी ग्रामोद्योगाच्या ‘स्फूर्ती’ या उपक्रमातून गावोगावी सूत तयार करून खादी जिन्सच्या निर्मितीला सहकार्य करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन गडकरी यांनी केले आहे.

५ हजारांवर युवकांना रोजगार

यंदाच्या यूथ एम्पावरमेंट समिटमध्ये ६० च्यावर कंपन्या आल्या असून त्या ४८०० जणांची भरती करणार आहेत. आमदार निवासच्या १०० खोल्यांमध्ये या भरतीसाठी मुलाखती घेतल्या  जाणार आहेत. यासाठी मनुष्यबळ व्यवस्थापकसुद्धा येथे दाखल झाले आहेत. मागच्या वर्षी ५ हजारांच्यावर युवकांची निवड झाली होती. – प्रा. अनिल सोले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 12:13 am

Web Title: job job be a giver nagpur nitin gadkari akp 94
Next Stories
1 स्थलांतरित प्रजातींमध्ये आशियाई हत्ती, माळढोकच्या समावेशाचा प्रस्ताव
2 तुकडोजी महाराज अध्यासनाच्या मूळ उद्देशाला तडा 
3 सर्वशाखीय कुणबी समाजाचा ‘कॅन्डल मार्च’
Just Now!
X