अतिदक्षता विभागात उपचार सुरु

नागपूर : एका मराठी वृत्तपत्रामध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ पत्रकाराने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री घडली असून या पत्रकाराला इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दिलीप दुपारे रा. इंदोरा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकाराचे नाव आहे. टाळेबंदीमध्ये वृत्तपत्राची विक्री कमी झाली आहे. शिवाय महसूल मोठय़ा प्रमाणात कमी झाला असून अनेक पत्रकार व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वृत्तपत्र कंपन्यांनी कपात केली. या बाबीमुळे अनेक पत्रकार व कर्मचारी तणावात आहेत. यादरम्यान रविवारी दुपारे यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मेयोत दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मेयोतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सध्या ते कृत्रिम जीवरक्षण प्रणालीवर असून पुढील ७२ तास अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी इतका टोकाचा निर्णय घेण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. कदाचित कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.