सासू, सासऱ्यासह तिघांना अटक

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुलगी करिश्मा हिचा तिच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सासू, सासऱ्यासह तिघांना अटकही करण्यात आली आहे.

करिश्माचे सासरे पुरुषोत्तम दरोकर (५६), सासू ललिता पुरुषोत्तम दरोकर (५२) आणि संजय टोंगसे (४५) सर्व रा. सद्भावनानगर, ओंकारनगर, मानेवाडा रिंग रोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. करिश्माचा पती पलाश पुरुषोत्तम दरोकर (२३) आणि प्रशांत टोंगसे अशी फरार आरोपींची नावे आहेत. करिश्मा पलाश दरोकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करिश्मा ही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची कन्या असून तिचा विवाह पलाशशी झाला होता. दरम्यान पती, सासू, सासरे, पतीचे मामा व मामेभाऊ हे हुंड्यासाठी  छळ करीत असल्याने तिने सीताबर्डी पोलिसांत तक्रार दिली.

याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करून पाच जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांर्गत (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सीताबर्डीच्या सहाय्यक पोलीस आयुक्त तृप्ती जाधव या करीत आहेत.