01 March 2021

News Flash

वर्तमान परिस्थितीमुळे विचार प्रदूषित होण्यापासून स्वत:ला वाचवा

घटनेनुसार प्रत्येक व्यक्ती सामाजिक, धार्मिक आणि राजकीय पातळीवर समान आहे.

संविधानाला अपेक्षित भारत घडवण्यासाठी सत्य बोलावे लागेल. सत्य बोलण्यासाठी धाडसी व हिंमतवान व्हावे लागेल. हे सर्व करताना तुमचे संवैधानिक विचार वर्तमान सामाजिक परिस्थितीमुळे प्रदूषित होणार नाही, याची काळजी घ्या, असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना न्या. चेलमेश्वर यांनी अप्रत्यक्षपणे वर्तमान सामाजिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.

न्या. जे. चेलमेश्वर यांचे प्रतिपादन

देश घडवण्यामागची संकल्पना संविधानात स्पष्ट असून सामाजिक, राजकीय, धार्मिक पातळीवर प्रत्येकजण समान असला पाहिजे, असे उद्दिष्ट आहे. त्या संकल्पनेनुसार देश घडवण्यासाठी  गेली सत्तर वर्षे प्रयत्न झालेत. मात्र, भविष्यातील भारत कसा असेल व तुम्हाला कोणत्या भारतात राहायचे आहे, याचा निर्णय तरुणाईला घ्यावा लागेल. त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील. संविधानानुसार भारत घडवायचा असेल तर वर्तमान सामाजिक परिस्थिती तुमच्या विचारांना प्रदूषित करणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, असा हितोपदेश करून सर्वोच्च न्यायालयाने  न्या. जे. चेलमेश्वर यांनी अप्रत्यक्षपणे देशातील सामाजिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीद्वारा (एनएलयू) शनिवारी विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व एनएलयूचे कुलपती शरद बोबडे आणि न्या. भूषण गवई यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. आंबेडकर हे देशातील सर्वात मोठे विद्वान होऊन गेले. त्यांनी या देशाला अतिशय सुंदर असे संविधान दिले आहे. मात्र, देशातील राजकीय पुढारी आपल्या सोयीनुसार आंबेडकरांच्या नावाचा वापर करून सत्तेसाठी मत मिळवतात, असेही न्या. चेलमेश्वर यावेळी म्हणाले.

घटनेनुसार प्रत्येक व्यक्ती सामाजिक, धार्मिक आणि राजकीय पातळीवर समान आहे. सत्तर वर्षांपासून विविध पातळ्यांवर असलेली असमानता नष्ट करून संविधानानुसार भारत घडवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, भविष्यातील भारत कसा असावा आणि तुम्हाला कोणत्या भारतात राहायचे, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. संविधानानुसार देश घडवण्यासाठी समोर येणाऱ्या आव्हानांना घाबरून न जाता त्यांचा सामना करावा लागेल. ही कृती करण्याची वेळ असल्याने केवळ पैसा कमावण्याच्या उद्देशातून नाही, तर सामाजिक मूल्ये जपण्यासाठी वकिली शिका, असा सल्ला न्या. चेलमेश्वर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केला.

न्या. बोबडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएलयूचे कुलगुरू प्रा. विजेंदर कुमार यांनी केले, तर कुलसचिव डॉ. एन.एम. साकरकर यांनी आभार मानले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 4:50 am

Web Title: justice chelameswar attended ambedkar birth anniversary event in nagpur national law university
Next Stories
1 गंभीर जखमी झालेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी गृहराज्यमंत्र्यांची धाव
2 सरकारकडून नेहमीच न्यायपालिकेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
3 उत्तराखंडनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटय़ांचा मृत्यू
Just Now!
X