कमला नेहरू महाविद्यालयात गोंधळ

शहरातील इतर केंद्रांच्या तुलनेत सक्करदऱ्यातील कमला नेहरू महाविद्यालयात सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या व्यवस्थापनातील गलथान कारभाराने कळस गाठला आहे.

१७ जूनपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वरमधील तांत्रिक गोंधळ आणि व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे विद्यार्थी व पालकांना सलग चार दिवसांपासून प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. तांत्रिक अडचणीमुळे सोमवार आणि मंगळवारी काहीच काम होऊ शकले नाही. बुधवारीही हीच स्थिती कायम होती. निदान गुरुवारी तरी सर्व काही सुरळीत होईल, असे वाटत असताना परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. सकाळी सहा वाजेपासून रांगेत लागलेले विद्यार्थी आणि पालक थेट सायंकाळीच घरी पोहचत आहेत. त्यातही अध्र्याअधिक विद्यार्थ्यांचे काम झालेलेच नाही. तांत्रिक अडचणींमुळे कागदपत्रांच्या तपासणीची तारीख वाढवून देण्यात आली, पण प्रवेश प्रक्रियेची गती पाहता पुढील दोन दिवसात काम होईल का, याविषयी शंका आहे. तांत्रिक गोंधळ तर प्रचंड आहे, त्याहीपेक्षा व्यवस्थापनातील त्रुटी विद्यार्थी व पालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. प्रत्येक दिवशी मर्यादित विद्यार्थ्यांना टोकन देऊन बोलावण्याऐवजी सरसकट सर्वानाच टोकण देऊन बोलावल्याने या केंद्रावर प्रचंड गोंधळ उडत आहे. पहिल्या दिवशी ज्यांची प्रक्रिया अर्धवट राहिली ते दुसऱ्या दिवशी येत आहेत. दुसऱ्या दिवशीचे तिसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीचे चौथ्या दिवशी असा प्रकार सुरू आहे. येथील रांग बाहेपर्यंत पोहोचत आहे. विद्यार्थी ही प्रक्रिया घरूनही पार पाडू शकतात. पण, त्यांना घरून काही समस्या आली तर तुम्हाला सांगणार कोण, असे सांगून केंद्रावरच यायला सांगण्यात आले. मात्र, केंद्रात आल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत करणारा कुणीही नाही. एका खोलीत सुमारे ५० संगणक असतील तर त्यातील आठ-दहा संगणकच सुरू आहेत. त्यातही अर्धा अर्ज भरल्यानंतर सर्वर बंद पडत आहे. अशा परिस्थितीत गोंधळलेल्या विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणारा कुणीही नाही. यापूर्वी सर्व अभ्यासक्रमांकरिता वेगवेगळी प्रवेश प्रक्रिया होती. मात्र, आता तीन-चार अभ्यासक्रमांसाठी एकच ठिकाण आणि एकच रांग असल्याने सीईटीच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बुधवारी आम्ही गेलो. तीन-चार तास रांगेत राहिल्यानंतर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने परत यावे लागले. आज पुन्हा गेलो, याठिकाणी कुणी माहिती द्यायला तयार नाही आणि साधी पाण्याची देखील व्यवस्था नाही. सकाळी सहा वाजेपासून मुलगा रांगेत लागला आहे. दुपार उलटून गेल्यानंतरही त्याचा नंबर लागलेला नाही. शेवटी त्याला पाणी आणि खाद्य नेऊन दिले. रांगेतच उभे राहून त्याने कसेबसे ते खाल्ले.    – पप्पू माहेश्वरी, पालक.

दररोज विशिष्ट संख्येत टोकन देऊन तेवढय़ाच मुलांना बोलवायला हवे होते, पण याठिकाणी सरसकट शेकडोंच्या संख्येने टोकन वाटले. त्यातही टोकननुसार न बोलावता मागेपुढे विद्यार्थ्यांना बोलावले जात आहे. मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. सकाळपासून ऊन आणि उकाडय़ात उपाशी तासन्तास उभे राहावे लागत आहे.    – डॉ. सूर्यकांत डेंगरे, पालक.