फक्त घोषणा देऊन देश चालत नाही. त्यासाठी दृष्टिकोन असावा लागतो आणि कपडे बदलून दृष्टिकोन बदलता येत नाही, असा टोला जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लगावला. मोदीभक्ती आणि देशभक्ती यातील फरक कळला पाहिजे, असेही त्याने विरोध करणाऱ्यांना सुनावले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीनिमित्त नागपूरमध्ये आलेल्या कन्हैया कुमारने येथील धनवटे राष्ट्रीय महाविद्यालयात उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कन्हैयाच्या दिशेने चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर काही जणांनी कन्हैया बोलण्यासाठी उभा राहिल्यावर ‘भारतमाता की जय’ अशा घोषणाही दिल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सभागृहाच्या बाहेर काढले.
कन्हैया म्हणाला, बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेमुळेच नागरिकांना विरोध करण्याचा अधिकार मिळाला. आता कोणी दगड मारून आम्हाला घाबरवायचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही. केवळ घोषणा देऊन देश चालत नाही. त्यासाठी दृष्टिकोन असावा लागतो आणि कपडे बदलल्याने दृष्टिकोन बदलत नाही. ५० वर्षे ज्यांनी आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नाही. ते काय आम्हाला देशभक्ती शिकवत आहेत. देशातील गरिबांचे, शोषितांचे, वंचितांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला टाकण्यासाठीच देशभक्ती विरूद्ध देशद्रोही असा वाद घडवून आणला जात आहे, असा आरोप कन्हैयाने केला.
भाजपला राममंदिर बनवायचे नसून, देश तोडायचा आहे, असा गंभीर आरोप करून कन्हैया म्हणाला की, आम्ही राजकीय लोकशाहीबद्दल बोलतच नाही. आम्हाला सामाजिक लोकशाही हवी आहे. मोदी म्हणजे देश नाही. संघ म्हणजे संसद नाही आणि मनुस्मृती म्हणजे देशाची घटना नाही. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही मनुस्मृती जाळून दाखवा, असेही आव्हान त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिले.