पालकमंत्र्यांची आढावा बैठक

नागपूर :  करोना नियंत्रण करताना प्राणवायू, रेमडेसिविर व खाटा उपलब्धतेवर काळजीपूर्वक लक्ष ठेवा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले.

नागपूर शहरातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी सोमवारी बैठक घेतली.  नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या ७ लाख ६१४ शिधापत्रिकाधारक आहेत. जिल्ह्यात तेराशे स्वस्त धान्य दुकाने आहेत. अंत्योदयमध्ये ७७ हजार ७८ पत्रिका धारकांचा समावेश आहे. प्राधान्य धारकामध्ये ३ लाख १५ हजार ८२ पत्रिका धारकांचा समावेश आहे. या सर्वांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मोफत वाटप करणे आवश्यक आहे, त्यानुसार नियोजन करावे. तसेच १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण संदर्भातही आढावा घेतला. सध्या इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली महिला रुग्णालय, मनपा आयसोलेशन रुग्णालय इमामवाडा या तीन केंद्रांवर लसीकरण सुरू करता येऊ शकते. तथापि, महापालिकेला आतापर्यंत किती डोसेस प्राप्त झाले आहेत, त्यानुसार हे नियोजन कधी सुरू करायचे हे ठरवले पाहिजे. नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी येत असल्याची तक्रार आहे. नोंदणी प्रक्रिया देखील सहज, सुलभ व्हावी यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याकडे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले.

आतापर्यंत रेमडेसिवीरच्या ४ लाख ३५ हजार लसी मिळालेल्या आहेत. उच्च  न्यायालयाने देखील इंजेक्शन पुरवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुरवठ्याबाबत लक्ष ठेवावे, तसेच प्राणवायूच्या पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून नियोजन करावे, अशा सूचना राऊत यांनी दिल्या. बैठकीला विभागीय आयुक्त संजीवकु मार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते.