23 October 2018

News Flash

खापरखेडा प्रकल्प अधिकारी वर्तमानपत्रांच्या जाहिरातीत!

सरकारी प्रकल्पातील एकाही अधिकाऱ्यांचे छायाचित्र तर सोडा नावही ठळकपणे वापरले जात नाही.

वर्तमानपत्रात प्रसिद्ध जाहिरात

वर्तमानपत्रांच्या खासगी जाहिरातीत सर्वसामान्यपणे राजकीय नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांचे छायाचित्र ठळक दिसते. परंतु खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त कंत्राटदारांकडून खासगी स्वरूपात प्रकाशित जाहिरातीत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांसह उपमुख्य अभियंत्यांचे छायाचित्र ठळकपणे प्रकाशित झाले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांबरोबर आता अधिकाऱ्यांची जाहिरातीसाठी चढाओढ सुरू झाली काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी आपले नाव कंत्राटदारांनी परस्पर टाकल्याचा दावा करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

पालकमंत्र्यांसह सर्वच पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये खासगी जाहिरातीच्या माध्यमातून नागरिकांपुढे सतत चर्चेत राहण्याची स्पर्धा दिसते. विविध वर्तमानपत्रांना बऱ्याच जाहिराती राजकीय पुढारी थेट स्वत: देत नसले तरी त्यांचे कार्यकर्ते देत असतात. या जाहिरातींमध्ये  सरकारी प्रकल्पातील एकाही अधिकाऱ्यांचे छायाचित्र तर सोडा नावही ठळकपणे वापरले जात नाही.

परंतु खापरखेडा औष्णिक वीज केंद्र त्याला अपवाद ठरले आहे. या केंद्राला २८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्याने शुभेच्छा देणारी एक जाहिरात सोमवारी एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. त्यात नागपूरचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यांचे छायाचित्र सोडा नावही नाही.

परंतु त्यात ठळकपणे मुख्य अभियंता राजेश पाटील, उपमुख्य अभियंता प्रदीप फुलझेले, उपमुख्य अभियंता राजेंद्र राऊत यांच्यासह खापरखेडा वीज निर्मिती प्रकल्पातील कंत्राटदारांची नावे प्रसिद्ध झाली आहेत. कंत्राटदारांनी खापरखेडा प्रकल्पातील तीनही मुख्य अधिकाऱ्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यामुळे त्यांना त्या बदल्यात काही विशिष्ट लाभ मिळणार काय? अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या या जाहिरातीबाबत खापरखेडा प्रकल्पातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित कंत्राटदारांकडून परस्पर ही जाहिरात दिल्याचे सांगून या प्रकल्पाशी त्यांचा संबंध नसल्याचा दावा केला. परंतु अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांचे छायाचित्र जाहिरातीत वापरणे हे शक्य आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

First Published on January 9, 2018 2:52 am

Web Title: khaparkheda power plant project officer in newspapers advertisement