17 October 2019

News Flash

मूत्रपिंड निकामी झालेले कर्मचारी रेल्वेसाठी स्वस्थ

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे विभागीय सचिव हबीब खान यांची  मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली.

(संग्रहित छायाचित्र)

रेल्वे रुग्णालय प्रशासनाचा दावा

नागपूर : शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त नसलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रकृतीला झेपेल असे काम मिळावे म्हणून आवश्यक असणारा अभिप्राय देण्यास मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय  रुग्णालय  प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने आजारी कर्मचारी त्रस्त झाले आहेत. दोन्ही किडन्या निकामी झालेल्या तसेच इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना प्रशासनाने त्यांचे बाह्य़रूप धडधाकट दिसत असल्याचे पाहून त्यांना तंदुरुस्त ठरवले आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांना विभागीय रुग्णालयात उपचाराची सोय आहे. वेळेप्रसंगी  गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवले जाते. यासाठी  रेल्वेने नागपूर शहरातील २९ खासगी रुग्णालयांशी आणि ४ एमआरआय-सिटी स्कॅन सेंटरशी करार केला आहे. मात्र, अनेकदा ट्रॅकमन, गँगमन, चाबीवाला, स्थानक उपव्यस्थापक आणि इतर विभागातील जे कर्मचारी हृयविकार, किडनीचे आजार आणि कर्करोगाने ग्रस्त आहेत, त्यांना रुग्णालय प्रशासन खासगी रुग्णालयात उपचार करण्याची शिफारस करीत नाही.  दुसरीकडे गंभीर आजारपणामुळे शारीरिकदृष्टय़ा सक्षम नसलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडील अवघड कामातून मुक्त होण्यासाठी रेल्वे रुग्णालय प्रशासनाच्या प्रमाणपत्राची गरज असते. ते सुद्धा दिले जात नाही. दोन्ही किडन्या निकामी झालेल्या ट्रॅकमॅनला  केवळ याच कारणामुळे  दररोज १४ किमी अंतर पायी चालून रात्री-अपरात्री काम करण्यास भाग पाडले जात आहे.

नागपूरच्या रुग्णालयात यापूर्वी दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे विभागीय सचिव हबीब खान यांची  मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी पुरेसी काळजी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे संसर्ग झाला होता. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात २५ हजार ३५० कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी नागपुरात विभागीय रेल्वे रुग्णालय आहे. त्यात २२ वैद्यकीय अधिकारी आणि ६० कर्मचारी आहेत. शिवाय विभागात वेगवेगळ्या ठिकाणी दहा डॉक्टर आहेत. नागपुरातील रुग्णालयात सर्व प्रकारचे तज्ज्ञ आहेत, परंतु  गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवण्यात येते. त्यासाठी रेल्वेने नागपूर शहरातील २९ खासगी रुग्णालयांशी आणि ४ एमआरआय-सिटी स्कॅन सेंटरशी करार केला आहे.

रुग्णालयातील सर्व उपकरणे अद्ययावत आहेत. आवश्यकता भासल्यावरच रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवले जाते, असा दावा सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव यांनी केला.

मूत्रपिंड निकामी, पण ट्रॅकमन ‘फिट’

दोन्ही किडनी निकामी असोत वा हृदयविकाराचा त्रास असो किंवा कर्करोग झालेला असो. तुम्ही वरून धडधाकट दिसत असाल तर रेल्वे प्रशासन त्यांच्या कर्मचाऱ्यांना काम करणे भाग पाडते. त्यातून त्यांची सुटका नाही, असे नागपूर रेल्वे रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधीक्षक विनोद आसुदानी यांनी ट्रॅकमन, इंजिन चालक आणि स्थानक उपव्यवस्थापकांना सांगितले आहे. या पीडित कर्मचाऱ्यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यथा सांगितली. यासंदर्भात आसुदानी प्रसिद्धी माध्यमांशी बोलत नाही.

First Published on January 12, 2019 12:45 am

Web Title: kidney failure employee healthy for railway administration