शहरात आणखी दोन किडनी प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा; सुपरस्पेशालिटी रुग्णालयात शस्त्रक्रिया

जागतिक किडनी प्रत्यारोपण दिनाच्या पाश्र्वभूमीवर नागपूरच्या अवयव प्रत्यारोपणाकरिता लागणारे आवश्यक अधिकार असलेल्या समितीने शहरातील दोन किडनी प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा केला आहे. पैकी एका प्रकरणात आई आपल्या वीस वर्षीय मुलाला तर दुसऱ्या प्रकरणात बहीण आपल्या भावाला स्वतची एक किडनी देऊन जीवदान देण्याचा प्रयत्न करेल. लवकरच दोनपैकी एक शस्त्रक्रिया नागपूरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात होणार असून ही राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत राज्यातील दुसरी शस्त्रक्रिया ठरणार आहे.

महाराष्ट्रात किडनी प्रत्यारोपणात मुंबईनंतर नागपूरचा दुसरा क्रमांक लागतो. नागपूरच्या काही निवडक खासगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा असली तरी त्याला दहा लाखांहून जास्तचा खर्च अपेक्षित असतो. तो साहजिकच गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा असल्याने ते जमेल तेव्हा डायलेसीस करून आजचे मरण उद्यावर ढकलत असल्याचे चित्र होते. शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया येत असली तरी त्याकरीता फार कमी निधीची तरतूद असल्याने एकही खासगी रुग्णालय या शस्त्रक्रियेसाठी तयार नसते. त्यातच नागपूरसह मध्य भारतातील एकाही शासकीय रुग्णालयात या शस्त्रक्रियेची सुविधा नव्हती.

तेव्हा किडनी प्रत्यारोपणाची गरज असलेले बरेच रुग्ण पैशाअभावी उपचार शक्य नसल्याने आपला जीवही गमावून बसत होते. शासनाने पुढाकार घेत नागपूरच्या सुपरस्पेशालीटी रुग्णालयात गेल्या महिन्यात किडनी प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. परंतु त्यानंतरही शहरात किडनी प्रत्यारोपणाकरिता अद्यापही ‘ब्रेन डेड’ रुग्णाचे नातेवाईक अवयव दानाकरिता पुढे येत नसल्याचे निराशाजनक चित्र आहे.

अवयव मिळत नसल्याने किडनी, लिव्हरसह विविध अवयवांची गरज असलेले बरेच गंभीर रुग्ण नागपूरसह देशात दगावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नागपूरच्या सुपरस्पेशालीटी या शासकीय रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाची सोय उपलब्ध होताच येथे प्रतिक्षायादी वाढायला सुरवात झाली आहे. पैकी प्रथम दोन प्रकरणातील किडनी प्रत्यारोपणाला नुकतीच अधिकार असलेल्या समितीकडून मंजुरी दिली गेली. दोन्ही शस्त्रक्रिया नागपूरच्या सुपरमध्ये प्रस्तावित असून पैकी एक शस्त्रक्रिया काही दिवसांत करण्याचे नियोजन सुरू आहे.

कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरणार कधी ?

नागपूरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू झाल्याने शासनाने तातडीने आवश्यक वर्ग १ ते ४ पर्यंतचे कर्मचारी येथे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसे झाल्यास येथे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया वाढून मोठय़ा प्रमाणावर नागरिकांना जीवदान मिळणे शक्य आहे. परंतु वरिष्ठ निवासी डॉक्टरांपासून निवासी डॉक्टर व इतरही कर्मचारी येथे मिळत नसल्याने शासनाच्या धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रत्येक आठवडय़ाऐवजी येथे २० ते ३० दिवसांत केवळ एक शस्त्रक्रिया शक्य आहे.