आधी करोना व नंतर पुन्हा मंजुरी न मिळाल्याचा फटका

नागपूर : मध्य भारतात मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी शहरातील सुपरस्पेशालिटी रुग्णालय हे एकमात्र केंद्र आहे. परंतु प्रथम करोनाचा प्रादुर्भाव व त्यानंतर या केंद्राला पाच वर्षांनंतर पुन्हा केंद्रासाठी मंजुरी न मिळाल्याने येथील  प्रत्यारोपण थांबले आहे. त्याचा सर्वाधिक फटका गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील रुग्णांना बसत आहे.

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात २०१६ मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र सुरू झाले. हे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील पहिले केंद्र होते. या केंद्रातच  त्यावेळच्या राजीव गांधी जीननदायी आरोग्य योजनेतून पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून येथे प्रत्येक वर्षी हे प्रत्यारोपण २०१९ वर्षांपर्यंत वाढत होते. परंतु करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर प्रत्यारोपणावर मर्यादा आल्या. त्यातच करोनामुळे या प्रत्यारोपण केंद्राची प्रत्येक पाच वर्षांनी  घ्यायची मंजुरी खोळंबली. त्यामुळे आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावरही येथे  मोठय़ा संख्येने रुग्ण असतानाही शस्त्रक्रिया करता येत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

करोनामुळे मार्च २०२० पासून सुपरस्पेशालिटीतील मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या. परंतु डिसेंबर २०२० मध्ये पुन्हा शस्त्रक्रिया केली गेली. या केंद्रासाठी आता ट्रान्सप्लांट समुपदेशक मिळाला असून गेल्या आठवडय़ात आरोग्य विभागाच्या समितीने निरीक्षण केले आहे. त्यामुळे तातडीने केंद्राला मंजुरी मिळण्याची आशा आहे. त्यानंतर पुन्हा प्रत्यारोपण वाढवले जाईल.

– डॉ. मिलिंद फुलपाटील,

विशेष कार्य अधिकारी, सुपरस्पेशालिटी रुग्णालय.

गेल्या आठवडय़ात समितीकडून निरीक्षण

मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्राच्या निरीक्षणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या आठवडय़ात  इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील  तज्ज्ञ डॉक्टर आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) औषधशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांचा समावेश असलेल्या समितीला  रुग्णालयात पाठवले होते. ही समिती जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मदतीने राज्याच्या आरोग्य संचालकांना हा अहवाल सादर करेल. त्यामुळे या अहवालातील निरीक्षणावरच या केंद्राच्या परवानगीचे भविष्य अवलंबून राहणार आहे.

मूत्रपिंड प्रत्यारोपण

   वर्ष            प्रत्यारोपण

२०१६             ०९

२०१७             १७

२०१८              १३

२०१९              २१

२०२०              ०६

२०२१               ००