*  दुसरा कर्मचारी गंभीर

अमरावती बायपास मार्गावर मध्यरात्रीचा थरार

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची कुऱ्हाडीने हत्या करून लूटमार करण्यात आली. या हल्लयात दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला. हिंगणा-अमरावती बायपास मार्गावर बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. महामार्गावरील लूटपाटीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पंढरी श्रीराम भांडारकर (६१) रा.वैभवनगर असे मृताचे तर लीलाधर मारोतराव गोहते (५३)  रा.पूजा लेआऊट जयताळा असे जखमीचे नाव आहे. हिंगणा-अमरावती बायपास येथे संजय मधुकर उगले (४७) रा. दीनदयालनगर यांच्या मालकीचा विद्या सर्वो नावाचा पेट्रोल पंप आहे. लीलाधर व पंढरी दोघे रात्रीपाळीला येथे कार्यरत होते. रात्री दोघेही कॅबिनमध्ये झोपले असताना पहाटे चार ते पाच दरोडेखोर आत शिरले. दरोडेखोरांनी भांडारकर व गोहते यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात भांडारकर यांचा जागीच मृत्यू झाला.  दरोडेखोरांनी  एक लाखाची रोख लुटली व पसार झाले. मनोहर काळे यांचा परिसरात गोठा असून सकाळी ७ वाजता ते वाहनात पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावर आले असता ही घटना उघडकीस आली.  माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे  तेथे पोहोचले. भांडारकर यांचा मृत्यू झाला होता तर लीलाधर जखमी होते. त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.  याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू आहे. पेट्रोल पंप व कॅबिनमध्ये सीसीटीव्ही आहेत. परंतु घटनेच्या वेळी ते बंद होते. दरोडेखोरांनी सीसीटीव्ही बंद केले की आधीपासूनच ते बंद होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. डीव्हीआर जप्त केला असून या प्रकरणात पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

कुऱ्हाडीने कपाट फोडले

दोघांवर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्याकडील कुऱ्हाडीने कपाटाचे कुलूप तोडून एक लाख रुपयांची रोख लुटली. दोन दिवस पेट्रोल व डिझेलच्या विक्रीतून ही रोख जमा झाली होती.