डॉ. तनुजा नाफडे यांची माहिती, लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट; आज गणतंत्रदिनी राजपथावर सादरीकरण

भारतीय सशस्त्र दलात आजही अनेक परंपरा ब्रिटिशकालीन आहेत. त्यात ‘मार्शल धून’चाही समावेश होता. परंतु मी ‘शंखनाद’ या भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित ‘मार्शल धून’ बनवली आणि ती सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवडली. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा उद्या, २६ जानेवारी रोजी ७० व्या गणतंत्र दिनी तीनही सशस्त्र दलाचे जवान राजपथावर ‘मार्शल धून’च्या निनादात ‘मार्च पास्ट’ करणार आहेत, अशी माहिती  नागपूरकर संगीतकार डॉ. तनुजा नाफडे यांनी दिली. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्या बोलत होत्या.

डॉ. तनुजा नाफडे म्हणाल्या, भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांचा मिलाफ असलेली ही मार्शल धून किरवानी, विलासखानी-तोडी आणि भैरवी या तीन रागांमध्ये  गुंफण्यात आली आहे. भारतीय मार्शल धूनमध्ये तीन गोष्टींचा समावेश आहे. जगातील ही अशाप्रकारची पहिली ‘मार्शल धून’ आहे जी भारतीय शास्त्रीय संगीत आणि वेस्टर्न म्युझिकच्या मिलाफाने बनलेली आहे. लष्कराच्या प्रत्येक सोहळ्यात आजवर ब्रिटिशकाळातील मार्शल धून वाजत असे. लष्कराची कार्यपद्धती ब्रिटिशकालीन आहे. त्यामुळे साहजिकच मार्शल धूनकडे कोणाचे लक्ष गेले नाही आणि ती बदलण्यासाठी प्रयत्नही झाले नाहीत.

लष्करात प्रशिक्षण सुद्धा पाश्चिमात्य संगीताचेच दिले जाते. त्यांच्याकडील वाद्य पाश्चिमात्य संगीत वाजवण्यासाठीच बनवलेले आहेत. त्यामुळे सगळ्या मार्शल धून पाश्चिमात्य संगीतावर आधारित आहेत, परंतु आता अस्सल भारतीय मार्शल धून मिळाली आहे. विशेष म्हणजे, मला लष्कराची पाश्र्वभूमी नाही, मी संगीताची शिक्षक आहे. एका संगीत शिक्षकाने लष्करासाठी ‘मार्शल धून’ बनवली ही जगाच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय घटना आहे.

ही धून बनवण्याची प्रक्रिया २०१६ पासून सुरू झाली. महार रेजिमेंटचे प्रमुख मेजर जनरल मनोज ओक यांना रेजिमेंटला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने सगळा इतिहास संगीतबद्ध करायचा होता. तो पुढील पिढीला प्रेरणादायी असावा, असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी ब्रिगेडियर विवेक सोहेल (निवृत्त) यांना त्यावर गीत लिहिण्यास सांगितले. सोहेल यांनी तीन अंतरा असलेले गीत लिहिले.  त्यात सगळा महार रेजिमेंटचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला सुरात शब्द करायचे ठरले.  मेजर जनरल ओक आणि माझे पती यांची मैत्री होती. त्यामुळे त्यांनी मला विचारले, तुम्ही हे काम कराल काय? तोपर्यंत मला मार्शल धून काय असते माहितीच नव्हते. तरी देशाचे काम आहे, लष्कराचे काम आहे. मला ते करायला नक्की आवडेल असे म्हटले आणि मी ते काम हातात घेतले. नुसते कंपोझ करायचे नाही तर सैन्यांना शिकवायचेही होते.

महार रेजिमेंटचे मुख्यालय असलेल्या मध्यप्रदेशातील सागर येथे दीड-दीड महिन्यांनी जात असे. धून संगीतबद्ध केली, अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तिला मान्यता दिली. त्यानंतर त्यांच्या संगीत चमूला प्रशिक्षण दिले. या रेजिमेंटच्या हीरक महोत्सवात हे गाणे सात हजार सैनिक आणि अधिकाऱ्यांसमोर सादर झाले. सर्वाना ते खूप आवडले. तिन्ही सेनेच्या मार्शल धूनच्या दर्जाचे हे काम झाले आहे, असे लष्करी अधिकाऱ्यांना वाटले आणि ही मार्शल धून महार रेजिमेंटच्या पलीकडे जाऊन तिन्ही सेनेची ‘मार्शल धून’ झाली. सैन्यांना त्यांच्या वाद्यावर ही धून तयार करण्यासाठी अधिक प्रशिक्षण देण्यात आले. या चमूत ३६ सदस्य होते. प्रत्येकाला वेगळे वाद्य वाजवायचे होते. हे फारच कठीण काम होते. पाश्चिम संगीतातील हार्मोणी आणि भारतीय संगीतातील मेलोडी यांचा वापर झाला.

अन् लष्कर प्रमुखांची मान्यता लाभली

यशराज स्टुडिओमध्ये लाईव्ह रेकॉर्डिग केले. या सीडीची लष्करी अधिकाऱ्यांच्या सात-आठ पातळ्यांवर तपासणी झाली. अखेर लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी सप्टेंबर २०१८ ला या धूनला मान्यता दिली. लगेच ७ ऑक्टोबर २०१८ ला दिल्लीतील मानिक शॉ ऑडीटोरिममध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, लष्कराचे आठ माजी प्रमुख यांच्या उपस्थितीत सीडीचे लोकार्पण झाले. याप्रसंगी ताम्रपत्र आणि स्क्रॉल देऊन माझा सत्कार करण्यात आला. हे माझ्या संगीत साधनेचे सर्वोच्च यश आहे, असेही नाफडे म्हणाल्या.

संगीत साधनेचा प्रवास

सध्या मी आरएस मुंडले धरमपेठ महाविद्यालयात संगीताची प्राध्यापिका आहे. ११ व्या वर्गात शिकत असताना मी  एक गीत गायले होते. हे वडिलांना फार आवडले आणि मी शास्त्रीय संगीतात कॅरिअर करावे, असे त्यांनी सुचवले. त्यानंतर मी मुंबईला गायिका प्रभा अत्रे यांच्याकडे गाणे शिकायला गेले. त्या किराणा घराण्याच्या गायिका आहेत. त्यांच्या अनुभवाचा मला मोठा लाभ झाला, असेही  नाफडे यांनी सांगितले.