मेडिकल, मेयो, ऑरेंज सिटीत उपचार;मुलगा सळाखीवर पडताच श्वान चावला

नागपूर : संक्रांतीला नेहमीच्या तुलनेत उपराजधानीत कमी पतंग उडाले. परंतु पतंगमागे धावताना अपघात घडल्याने  मांजाने जखमी झाल्याने सुमारे १७ जणांना  रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. विश्वकर्मानगर येथे  पतंग पकडण्यासाठी धावणाऱ्या मुलाच्या मागे श्वान लागला. तोल जाऊन हा मुलगा सळाखीवर पडताच त्याला श्वानाने चावा घेतला. जखमी अवस्थेत त्याला मेडिकलला दाखल करण्यात आले.

सुजल वर्मा (१३) रा. विश्वकर्मानगर असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याला पतंगबाजीचे प्रचंड वेड आहे. बुधवारी तो घराजवळ पतंग उडवत होता. त्याला एक कटलेले पतंग येताना दिसले. त्याने धाव घेतली. वाटेत एक श्वान त्याच्या मागे लागला. तो पळत असताना तोल जाऊन  सळाखीवर पडला व जखमी झाला. याचवेळी त्याच्या उजव्या मांडीवर श्वानाने जोरात चावा घेतला. ही माहिती मुलाच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी जखमी मुलासह मेडिकल गाठले.

पतंग उडवताना हाताचा अंगठा  कापल्याने एका अडीच वर्षीय मुलालाही येथे उपचारासाठी आणले गेले. याशिवाय इतरही सुमारे आठ जणांना मेडिकल, मेयोत दाखल करण्यात आले. यापैकी तिघांच्या डोक्याला इजा झाली. यातील निम्म्याहून अधिक रुग्णांना प्राथमिक उपचार करून  रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

वकील, छायाचित्रकारही जखमी

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून जिल्हा न्यायालयाकडे जात असताना पतंगचा मांजा अंगावर आल्यावर अ‍ॅड. अल्पेश देशमुख यांचा हाताला इजा झाली.  छायाचित्रकार जसबिंदर दुचाकीवर कडबी चौकच्या पुलावरून जात होता. येथे अचानक त्याच्या अंगावर मांजा आल्याने ओठ व नाकाला इजा झाली. नायलॉन मांजाच्या विक्री व उत्पादनावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही बाजारात मोठय़ा प्रमाणात   नायलॉन मांजाची विक्री सुरूच असल्याचे या घटनांमधून स्पष्ट झाले आहे.

.. अन् गळ्यात मांजा अडकला

मानेवाडा चौकातून एक इसम दुचाकीवर जात होता. अचानक पतंगचा मांजा त्याच्या गळ्यावर आला. गळा कापला जात असतानाच त्याने स्वत:च्या  हाताने मांजा पकडून दूर फेकला. परंतु हे करताना त्याच्या बोटांना गंभीर इजा झाली. मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने तातडीने त्याला ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवले. त्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली.  या रुग्णावर डॉ. नुरल अमिन, डॉ. दीपक कोरे, डॉ. दर्शन रेवनकर, डॉ. स्मिता हरकरे यांनी उपचार केले.