‘ओ.. काट.., ढिल दे रे.., कट गयी रे पतंग..’ असा आरडाओरड करीत संक्रांतीला शहरातील विविध भागात मोठय़ा उत्साहात पतंगोत्सव साजरा करणारे काही मित्रमंडळाचे गट तयार झाले आहेत. ते सर्व एकत्र येऊन पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात. महाल परिसरात असाच एक मनोरंजन नावाचा २० ते २५ मित्रांचा गट तयार करण्यात आला असून गेल्या पंधरा वर्षांपासून सर्व मित्र-मैत्रीणी एखाद्या इमारतीच्या छतावर एकत्र येऊन येऊन पतंग उडवण्याचा आनंद घेतात.
महाल, नाईक रोड अणि शहराच्या इतर वस्त्यांमध्ये राहणारे हे सर्व युवक पंधरा वषार्ंपूर्वी एकत्र आले. त्यातील काही नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने शहराच्या बाहेर किंवा शहरात दुसऱ्या भागात असले तरी संक्रांतीला मात्र सुट्टी घेऊन दिवसभर मित्रांसोबत राहून पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात. संक्रांतीच्या दोन दिवस आधी सर्व मित्र एकमेकांच्या संपर्कात राहून कुठे जमायचे, खाण्यासाठी काय करायचे, पतंग आणि मांजा कोण आणणार, अशी सर्व कामे वाटून घेतली जातात. होळी, कोजागिरी आदी उत्सव साजरे करीत असताना एकत्र येऊन पतंग उडवण्याचा कार्यक्रम सुद्धा तितक्याच उत्साहात साजरा करत असतात.
या संदर्भात मनोज जपुलकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना वस्तीमधील आणि महाविद्यालयीन असे १० ते १२ मित्र एकत्र येऊन कोणाच्यातरी गच्चीवरून पतंग उडवित असताना एक एक करीत मित्र जुळत गेले आणि ३५ जणांचा गट तयार झाला. पूर्वी लुद्दी आणि सिरसचा मांजा तयार करीत होतो. संक्रांतीच्या एक दिवसआधी पाच ते सहा रिल सिरसचा मांजा तयार करीत होतो. त्यासाठी प्रत्येकजण येऊन सहकार्य करीत होता.
संक्रांतीच्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व मित्र महालातील जपूलकर यांच्या इमारतीच्या छतावर जमत होतो आणि दिवसभर मग एक एक करीत पगंग उडवण्याचा आनंद घेत होतो. तिघे पतंग उडवित असताना आकाशामध्ये असलेल्या वेगवेगळ्या पतंगासोबच पेच घेत होतो. ज्याचा पतंग तुटला त्यांच्या नावाने ‘ओ काट.. असे ओरडत आनंद व्यक्त करीत होतो. गुलाबी थंडी आणि हवा चांगली असली की पतंग उडवण्याचा आनंद वेगळाच असतो आणि त्याचा अनुभव आम्ही घेतो. योगेश उपगडे, प्रशांत पाणंधरे, महेश परिहार, शैलेश शर्मा, नाना मुलमुले, मनोज वांढरे, मंगेश गाढवे असे सर्व मित्र मंडळी आहे. अनेकजण कुटुंबांसमवेत येतात. त्यामुळे पतंग उडवण्यासोबतच खाण्या-पिण्याची नुसती चंगळ असते. महाल भागात पतंग उडवण्याची मजा काही औरच. पुढच्या वर्षीच्या संक्रातीची वाट पाहात आम्ही घरी परततो.