प्रत्येकजणच कोणता ना कोणता छंद जोपासत असतो. पतंगाचा छंद जोपासण्यात काही राजकरणी मंडळीदेखील अग्रेसर आहेत. अशाच काही पतंगाचा छंद जोपणाऱ्या निवडक जुन्या आणि नवीन पिढीतील राजकारण्यांनी पतंग उत्सवाबद्दल त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पतंग उडवणे हा माझा फारच आवडता सण आहे. गेल्या काही वर्षांपासून पतंग उडवतो नसलो तरी लहानपणी पतंग उडण्याचा आनंद घेतला आहे. महाल परिसरात घरे लागून असल्याने समोरच्या गच्चींवरील पतंगाशी पेच लावत होतो. सर्व मित्र मिळून शिरस आणि काचेपासून मांजा तयार करणे आणि पंतग उडवण्यात एक वेगळीच मजा होती. कुणी कुणाचा पतंग कापला, मांजा लुटला आणि कुणी तरी मांजावर ‘गिरगोट’ टाकला. याचीच चर्चा चालायची. पतंग कापल्या गेल्यास हिरमुसलेपण देखील येत होते. परंतु रात्री परिसरातील मित्रमंडळी एकत्र जेवण करीत होती. हा उत्सव आनंद देणारा आहे. त्याचा आनंद घेतला गेला पाहिजे, परंतु नायलॉन मांजाचा वापर करता कामा नये.
महापौर प्रवीण दटके

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा उत्सव पतंग उडवून साजरा करण्यात येतो. विदर्भ आणि मराठवडय़ात हा मोठय़ा प्रमाणात पतंग उडवण्यात येतात. मी वयाच्या ११ वर्षांपासून आजतागयत पतंग उडवण्याचा छंद जोपसतो आहे. या परंपरागत खेळामुळे आपली प्रतिष्ठा कमी होत असल्याचे काहींना वाटते, पण असे मला अजिबात वाटत नाही. मी मांजा घोटण्यात तरबेज होतो. शाळेतील माझे मित्र मांजा घोटण्याचे मार्गदर्शन माझ्याकडून घेत असत. काच कुटायचे, शिरस, पाणी उकळायचे आणि धाग्याला लावायचे. ही मांजा खोटण्याची प्रक्रिया आहे. पतंग उडवण्याची देखील एक विशिष्ट पद्धत असते. पतंगाला झोक देत देत ढील द्यावे लागते. पेच असताना अधिक ढील दिल्यास समोरच्या पतंग कटते. दोरा झोल मारत असल्यास आपलीच पतंग कटते. बांबूच्या कमच्या आणि ताव यांचा वापर करून पतंग तयार करायचो. पतंगाला सूत्र देखील मी स्वतचा बांधत होतो. पतंग उत्सवामुळे हाणामाऱ्या होतात. पतंग कटली की पोरं मांज्या लुटायला धावतात आणि त्यासाठी हाणामारी करतात. भांडणामुळे कटलेली पतंगाचे तुकडेतुकडे होतात. परंतु जसा पतंग उडवण्यात मजा आहे तसाच मांजा लुटण्यातही. मी यतवमाळ, अमरावती, नागपूरलाही पतंग उडवला. परंतु सर्वाधिक पतंग यवतमाळ येथेच उडवले.
जांबुवंतराव धोटे

लहानपणी आम्ही पंतग उडवायचो. माझे मोठे बंधू होशंग आवारी हे उत्तम पतंग उडवत असत. त्यांच्यात आणि माझ्यात १२ वर्षांचे अंतर होते. तो घराच्या गच्चीवर आपल्या मित्रासोबत पंतग उडवायचा आणि माझ्याकडे चक्री धरण्याची जबाबदारी असायची. मांजा बनवण्यापासून तर चक्री बनण्याचे काम देखील होशंग आणि त्याचे मित्र करीत असत. विजेच्या एका खांबापासून दुसऱ्या खांबापर्यंत धागा बांधून मांजा केला जात होता. साधारणत १९५७ ते १९६१ दरम्यानची गोष्ट आहे. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यासाठी १५ दिवसांपासून तयारी केली जात असे. माझी अडचण अशी होती, माझा पतंग फार काळ हवेत राहत नव्हता. तो पडून जात होतो. परंतु मी आकाशात पतंग उडताना बघण्याचा मोठा ‘शौकीन’ होतो. त्याकाळी विविध मंडळ स्पर्धा देखील आयोजित करीत होतो. शारदा उत्सव मंडळ, युवा मित्र मंडळ, रेशीमबाग मंडळ यांच्यात पतंग स्पर्धा असायची. स्पर्धा ओटपल्यानंतर सर्वजण मिळून चहा-नाश्ता करीत आणि ‘तीळगुळ घ्या आणि गोडगोड बोला,’ अशा शुभेच्छा एक-दुसऱ्या देत. दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राने अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करायला हव्यात.
गेव्ह आवारी

‘लंगोटदार’ पतंग
शहरात पतंग उडवण्याचे ‘शौकीन’ बरेच आहेत. नागपूरकरांनी पतंग आणि त्याच्याशी संबंधित अनेक नव्या शब्दांची निर्मितीदेखील केली आहे. पतंगाचा आकार, त्यावरील कलाकृती यावरून पतंगाचे नामकरण झाले आहे. छोटय़ा आकाराच्या पतंगाला ‘गिन्नी’ आणि मोठय़ा पतंगाला ‘ढेल’ असे संबोधले जाते. पतंगावरील डिझाईनवरून गोलेदार, मुच्छकडा, लंगोटटोक मुच्छा, टोकदार, आखेदार, लंगोट फर्रा, भांगदार, अर्धीरोटी, लंगोटदार, लंगोटकुन्ना, चाँददार अशी नावे पडली आहेत. पतंग अर्धाताव, एकताव ते दोन ताव आकाराचे असतात. अलीकडे नायलॉन मांजा आणि चिनी मांजा आला. परंतु पाच-सहा वर्षांंपूर्वी बरेली मांजा मोठय़ा प्रमाणात वापरला जात होता. त्यापूर्वी संकलबांबू, नवतारा, सहातारा, नवतारा बंधू, तीन तारा, एमपीसी धागा, कोंबडा, लिफाफा आदी कंपन्यांचा धागा पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येत होता.

लहानपणी दिवसरात्र पतंग उडवण्याचा विचार मनात रुंजी घालत असायचा. मकर संक्रांतीला आठ दिवस आधीपासून मांजा तयार करण्याच्या कामाला लागत असू. दोन खांबांना धागा बांधून मांजा तयार करत होतो. वेगवेगळ्या प्रकारचे पतंग उडवण्याची आणि पतंग कापण्याची काही वेगळाची मजा आहे
विकास ठाकरे