पैशाच्या वादात एका कंपनीत डांबूनही ठेवले
नागपूरच्या दोन व्यापाऱ्यांचे कृत्य
नागपूरच्या दोन व्यापाऱ्यांनी कोलकाताच्या एका व्यावसायिकाचे त्याच्याच चारचाकी वाहनाने अपहरण केले. या व्यावसायिकाला कळमना हद्दीतील एका कंपनीत डांबून थकवलेल्या पैशाची मागणी करीत मारहाण केली. कळमना पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
प्रमोद उर्फ गुड्डू ठाकूर व परवेज भाई असे दोघा आरोपींची नावे आहे. प्रमोद हा लकडगंजमधील लाकूड व्यावसायिक आहे. तर परवेज हा त्याच्या कंपनीतून लाकडाची उचल करतो. हे दोघेही मित्र असून गुंड प्रवृत्तीचे आहे. या दोघांकडील लाकूड कोलकात्याचे व्यापारी शालिकराम बुरहू शुक्ला (रा. बहुजी हट्टी, हातीपारा, कोलकाता, पश्चिम बंगाल) हे घेत होते. नागपुरातून माल कोलकात्यात विकत होते. यांच्यात लाखोंचा व्यवहार गेल्या चार वर्षांपासून सुरू होता.
शुक्ला यांच्याकडे काही रक्कम थकली होती. त्यामुळे प्रमोद ठाकूरने त्यांना पैशाची मागणी करीत त्यांची कार जप्त केली. त्यांनी पैसे देण्यास काही दिवसांचा वेळ मागितला. आरोपी प्रमोद आणि परवेज या दोघांनी शुक्ला यांचे कारने अपहरण केले. त्यांना न्यू मॉ उमिया वसाहतीत असलेल्या एका कंपनीत नेले. तेथे डांबून त्यांना जबर मारहाण करीत पैशाची मागणी केली. शुक्ला यांनी कशीतरी सुटका करून जवळचे कळमना पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.