कुल्लामामा (वाघ) आणि कोरकू यांचे ऋणानुबंध अनादीकाळापासूनचे. याच ऋणानुबंधातून कुल्लाच्या संरक्षणासाठी कोरकूंचे सुरक्षाकवच मेळघाटात तयार झाले आहे. राज्यात पहिल्यांदाच कुल्लाच्या संरक्षणासाठी कोरकूंचा चमू तयार करण्यात आल्यामुळे कुल्लामामांवरील शिकाऱ्यांचे सावट आता दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलात (एसटीपीएफ) स्थानिकांना प्राधान्य देणारा मेळघाट व्याघ्र प्रकल्प राज्यात पहिला प्रकल्प ठरला आहे.
जंगल आणि माणूस या नात्याला अलीकडे संघर्षांची किनार लाभली आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष पराकोटीला पोचलेला असतानाच मेळघाटात मात्र हे नाते अजूनही जपले जात आहे. मेळघाटच्या जंगलातील कोरकूंसाठी कुल्ला (वाघ) म्हणजे त्यांचा मामा आणि या मामाच्या संरक्षणासाठी त्यांचेच सुरक्षाकवच तयार केले. विशेष व्याघ्र संरक्षण दलात आजपर्यंत संपूर्ण राज्यभरातून जवानांची भरती केली जात होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने मात्र या दलासाठी स्थानिक युवक-युवतींची मदत घेण्याचे निश्चित केले. मेळघाट कुपोषणासाठी प्रसिद्ध आहे, पण मेळघाटातील कोरकू कुपोषित नाहीत हे या भरतीने दाखवून दिले. शारीरिक चाचणीत शहरातील जवानांनाही लाजवणारी कामगिरी कोरकू युवक आणि युवतींनी केली. पाच किलोमीटरचे अंतर अवघ्या ३० मिनिटांत कापून कुल्लामामाच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि परिसरात सुमारे ३०० गावे आहेत आणि त्यापैकी व्याघ्र प्रकल्पात सुमारे ८४ गावांचा समावेश आहे. याच क्षेत्रातील सुमारे ८८ युवक-युवतींची भरती दलात करण्यात आली.
वनखात्याने अलीकडेच या दलासाठी स्थानिक युवक-युवतींना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. स्थानिकांना त्यांचे जंगल माहिती असते, स्थानिकांना जंगलातील रस्ते माहिती असतात. अशावेळी वाघाच्या संरक्षणासाठी त्यांची चांगली मदत होऊ शकते.
विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात गावकरी विरुद्ध वनाधिकारी, असा जो संघर्ष उद्भवला आहे, त्यातही हे युवक-युवती आता दुवा म्हणून काम करणार आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलात स्थानिकांना प्राधान्य दिल्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या सेमाडोह येथे त्यांचे प्रशिक्षण सुरू असून या प्रशिक्षणातूनच त्यांची कामगिरी अधोरेखित होत असल्याचे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक व मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेश त्यागी यांनी सांगितले.