अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर राम मंदिराचे निर्माण होणार आहे. परंतु, राम राज्याचा संकल्प अजूनही अपूर्ण आहे. तो पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने विशेषत: राम भक्तांनी झटले पाहिजे, असे आवाहन  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

घटनात्मक पदावरील व्यक्तींनी धर्मनिरपेक्ष असणे अपेक्षित असताना राज्यपाल कोश्यारी यांनी रामराज्य आणण्याचे आवाहन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावेळी कोश्यारी यांनी राम मंदिरासाठी १ लाख ११ हजार रुपयांची देणगीही दिली.  राज्यपाल  कोश्यारी व आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियानाचा प्रारंभ  शुक्रवारी नागपुरातील श्रीराम पोद्दारेश्वर मंदिरात झाला.

दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी निधी उभारण्याकरिता नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल   कोश्यारी सहभागी होत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. एखादी संस्था निधी संकलन करीत असेल, तर त्याबद्दल आपणास काही बोलायचे नाही. परंतु राज्यपालपदावरील व्यक्तीने अशा कार्यक्रमापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल, असे ते म्हणाले.