* सर्वेक्षणात सकारात्मक संकेत * कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थीही सरसावले
कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारितील महाराजबागेतून जाणाऱ्या रस्त्याला कृषी महाविद्यालयाने परवानगी दिली. मात्र, या रस्त्याच्या जाळ्यात महाराजबाग प्राणिसंग्रहालय अडकल्याने या ऐतिहासिक वारस्याची होणारी दुर्दशा टाळण्यासाठी नागरिकच नव्हे तर महाविद्यालयाचे विद्यार्थीही सरसावले. हा लढा आता न्यायालयात गेला असला तरीही या लढय़ाला यश मिळण्याचे संकेत आता मिळायला लागले आहेत. महाराजबाग ते विद्यापीठ वाचनालयाच्या रस्ता रुंदीकरणादरम्यान होणाऱ्या झाडांची तोड बऱ्याच अशी थांबणार आहे.

पश्चिमेकडील २४ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारितील ६,०१७.९७ चौरस मीटर जागेला कृषी विद्यापीठातर्फे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. महाराजबागेच्या सुरक्षा भिंतीच्या आतून हा मार्ग जात असल्याने नर्सरी तसेच मुख्य प्रवेशद्वारातील अनेक झाडांवर कुऱ्हाड चालणार होती. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे जुनी झाडे आणि पर्यटकांसाठी असलेले प्रसाधनगृह तोडले जाणार होते. त्यामुळे महाराजबाग मित्र मंडळाने या झाडांच्या तोडीच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली. पूर्वेकडील १२ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी कृषी महाविद्यालयाने त्यांच्या ताब्यात असलेली १०९१.४४ चौरस मीटर जमीन काही अटी आणि शर्तीवर दिलेली आहे. या रस्त्याच्या निर्माण कार्यात येणाऱ्या झाडांवरसुद्धा महानगरपालिका कुर्हाड चालवणार आहे. त्यामुळे या आंदोलनाला कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही सहकार्य केले. पंजाबराव कृषी विद्यापीठाने दिलेली जागा ही शासनाच्या मालकीची असून विद्यापीठ ही केवळ काळजीवाहू संस्था आहे. त्यामुळे विद्यापीठाला जी जागा रस्ते निर्माण कार्यासाठी देण्याचा अधिकार नाही. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे निकष त्यामुळेच पाळण्यात येत नसून गैरसोयीचा कळस याठिकाणी गाठला आहे. महाराजबाग प्राणिसंग्रहालय संपुष्टात आणण्यासाठी विद्यापीठाने ही खेळी खेळल्याचा आरोप मंडळाने केला.

आरोपांची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागपूर महापालिका आणि ग्रीन विजील ही पर्यावरणवादी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. यात त्यांनी ५० टक्क्यांहून अधिक झाडे रस्ते रुंदीकरणात बळी जाण्यापासून वाचू शकतात, असा अहवाल देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते रुंदीकरणासाठी १०७ झाडे तोडावी लागतील, असे सांगितले होते. यात महाराजबागेच्या आतील झाडांचा बळी जाणार होता. मात्र, या अहवालामुळे ही झाडे वाचणार आहेत.

या संदर्भात महाराजबाग मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश चौबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ८० फुटांच्या रस्ते रुंदीकरणाच्या कामाला आधीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वेक्षणानंतर आलेल्या अहवालाचे पालन बांधकाम विभाग करेल का, यावर शंका त्यांनी व्यक्त केली. महाराजबागेसाठी मात्र आम्ही उच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.